February 12, 2026

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस उत्साहात

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हा रुग्णालय,धाराशिव येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक युनानी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आयुष विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
    या प्रसंगी आयुष विभागातील युनानी तज्ज्ञ डॉ.अबरार अहेमद देशमुख यांनी प्रास्ताविकात हकीम अजमल खान यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.हकीम अजमल खान हे स्वातंत्र्यसैनिक,प्रख्यात युनानी चिकित्सक,शिक्षक आणि समाजसुधारक होते.त्यांनी युनानी चिकित्सा प्रणालीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करून तिचे महत्त्व देश-विदेशात पोहोचविले, असे त्यांनी सांगितले.
    डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव व डॉ. सतीश हरिदास,जिल्हा आरोग्य अधिकारी,धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
    डॉ.शिवाजी फुलारी यांनी मार्गदर्शनपर भाषणात युनानी औषधपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.युनानी वैद्यक ही ग्रीक,अरबी आणि भारतीय संस्कृतींच्या संगमातून विकसित झालेली पारंपरिक आणि प्राचीन उपचारपद्धती आहे.शरीरातील रक्त,कफ,पित्त आणि काळे पित्त या चार द्रव्यांच्या संतुलनावर आरोग्य अवलंबून असते,असा युनानी तत्त्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत आहे.या द्रव्यांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास रोग उद्भवतात,त्यामुळे नैसर्गिक औषधे,वनस्पती,योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली यांना युनानी उपचारपद्धतीत विशेष महत्त्व दिले जाते,असे त्यांनी सांगितले.
    भारतामध्ये युनानी वैद्यकाला आयुष मंत्रालयामार्फत विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.देशभरात अनेक रुग्णालये व दवाखान्यांमध्ये युनानी उपचार उपलब्ध असून त्वचारोग, सांधेदुखी,पचनविकार तसेच दीर्घकालीन आजारांवर ही पद्धत प्रभावी ठरत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
    युनानी दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे या प्राचीन व नैसर्गिक उपचारपद्धतीबाबत जनजागृती करणे हा आहे.आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आणि नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
    कार्यक्रमास डॉ.नितीन भोसले (बालरोगतज्ज्ञ),डॉ.अंजली पवार (हॉस्पिटल मॅनेजर),डॉ.अबरार अहेमद देशमुख,डॉ.महेवीश शेख (युनानी तज्ज्ञ),डॉ.पल्लवी कोथळकर (आयुर्वेद तज्ज्ञ),डॉ. उजमा सय्यद,डॉ.सिमा पवार (होमिओपॅथी तज्ज्ञ),किरण बारकुल (फॅसिलिटी मॅनेजर),भारत हिंगमिरे (निसर्गोपचार तज्ज्ञ तथा औषधनिर्माण अधिकारी),मनोज पतंगे (योग तज्ज्ञ),श्रीमती मनीषा अंगरखे,फारुख काजी,सरवदे तसेच रुग्ण,नातेवाईक आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही विशिष्ट उपचारपद्धती किंवा आजाराबाबत अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा रुग्णालय,धाराशिव येथील आयुष विभागाशी संपर्क साधून या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ यांनी केले आहे.
error: Content is protected !!