पिंपळगाव डोळा (राजाभाऊ बारगुले यांजकडून) – येथील अंबाबाई देवी मंदिरात अंबाबाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.तीन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी पूजापाठाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली.संबळ,सनई,हलगी यांच्या गजरात व फटाक्यांच्या रोषणाईत सजविलेल्या रथातून देवीची गावभर मिरवणूक काढण्यात आली.संपूर्ण गावातील महिला, ग्रामस्थ मंडळी तसेच आजूबाजूच्या गावांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रात्री देवी मंदिरात जागरण-गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. दि.५ फेब्रुवारी रोजी दिवसभर पूजापाठ व होम-हवन करण्यात आले.रात्री आराधी मेळा व देवीची भक्तिगीते सादर करण्यात आली. भाविकांनी भक्तिभावाने कार्यक्रमाचा लाभ घेतला.
दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी विधीवत पूजापाठ,होम-हवन करून अंबाबाई देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न झाला.यावेळी ह.भ.प.दत्त महाराज आंबेडकर तसेच ह.भ.प.दत्ता महाराज आंबिरकर यांनी कीर्तन सेवा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. गावातील व परगावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कीर्तनाचा लाभ घेतलेल्या सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमासाठी देणगी देणाऱ्या महिला व मुलींना देवीचा फोटो, साडी-चोळी,बांगड्या व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्यात महिलांची उपस्थिती सर्वाधिक होती. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावातील तरुण मंडळी तसेच कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या युवकांनी पुढाकार घेत परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे अंबाबाई देवीचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
More Stories
“जिल्हा परिषद निवडणुकीत मंगरूळ गटाचा अजेंडा:विकास की फक्त राजकारण?”
“स्वप्नातील घर” साकारले : पिंपळगाव (डोळा) येथे सदघर योजनेअंतर्गत सुभाष घोडके यांच्या घराचा भव्य शुभारंभ
शेतात राबणाऱ्या हातांचा गौरव; राष्ट्रीय शेतकरी दिनी पांडुरंग आंबीरकर यांचा शेतातच सत्कार