“संत नामदेवाचे ज्ञानदीप लावू जगी” हे ब्रीदवाक्य केवळ घोषवाक्य न राहता जीवनध्येय बनवून ज्यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे थोर शिक्षणतपस्वी म्हणजे शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी होत. सर्व विज्ञानवादी संत, महंत व महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले.
निजामशाहीच्या काळात मराठवाडा अज्ञान, दारिद्र्य व सामाजिक अन्यायाच्या अंधारात असताना, बहुजन समाजातील मुलांनी शिक्षणाच्या प्रकाशात येऊन आपले जीवनमान उंचावावे, ही गुरुजींची ठाम भूमिका होती. त्या कठीण काळात संस्थामाता कै. सुमन आई मोहेकर यांच्या मोलाच्या साथ, प्रेम व काळजीच्या बळावर त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. हा केवळ शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर बहुजनांच्या आत्मसन्मानाचा व स्वावलंबनाचा लढा होता.
गुरुजींनी मराठवाड्यात विविध ठिकाणी शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये तसेच वरिष्ठ महाविद्यालयांची स्थापना करून दर्जेदार शिक्षणाची दारे बहुजन समाजासाठी खुली केली. “शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून माणूस घडवण्यासाठी आहे” हा विचार त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून ठळकपणे दिसून येतो.
आज एकविसाव्या शतकातही गुरुजींचा हा वैचारिक व शैक्षणिक वारसा कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जोमाने पुढे जात आहे. संस्था संचलित सर्व शैक्षणिक संकुलांमध्ये अध्यापन, प्रशासन व शिस्त यांचा सुंदर समन्वय साधत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. गुरुजींच्या स्वप्नांची पूर्तता हीच संस्थेची खरी ओळख बनली आहे. याच वैचारिक परंपरेचा विस्तार म्हणून प्रकाशित होत असलेले साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’ हे केवळ वृत्तपत्र न राहता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरत आहे. गुरुजींच्या मूळगाव मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अभ्यासू व संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले प्राचार्य अविनाश मोरे यांना राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून *‘साक्षी पावनज्योत’*ची सप्रेम भेट देण्यात आली. कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण क्षण साकार झाला.यावेळी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सूर्यकांत गुंगे, सहाय्यक शिक्षक धनंजय मडके, लिपिक बालाजी काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते हा प्रसंग म्हणजे शिक्षण, विचार आणि संस्कार यांचा सुंदर संगम होता. उपस्थित शिक्षक व कर्मचारी यांनी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. खऱ्या अर्थाने पाहता, शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी हे बहुजन समाजाच्या शैक्षणिक मुक्तीचे दीपस्तंभ होते. त्यांनी लावलेला ज्ञानदीप आजही असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत आहे आणि पुढील पिढ्यांना दिशा देत राहील,यात शंका नाही.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन