February 8, 2026

बालसंरक्षणाची बांधिलकी दृढ— बहुजन हिताय वसतिगृहात मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

  • उमरगा – शहरातील गुंजोटी रोडवरील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी बालसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. एम.एस.जमादार यांनी मार्गदर्शन केले.
    सध्याकाळात बालकांविषयी होणाऱ्या अनुचित घटना लक्षात घेता बालसंरक्षण ही गंभीर सामाजिक जबाबदारी बनली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बालकांच्या सुरक्षिततेत पालक, समाज घटक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. “स्वतःचा विकास स्वतः करावा लागतो… शिस्त, उत्तम आहार, नियमित व्यायाम, स्वच्छता व आरोग्य याकडे विशेष लक्ष दिले तरच सक्षम व्यक्तिमत्त्व घडते,” असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘गुड टच–बॅड टच’ या संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मैत्रीगीत सादर केले. सूत्रसंचालन संस्कार पवार (१० वी) यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुबुद्ध शिवशरणे (९ वी) यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सागर सास्तुरे, शान गायकवाड, संघर्ष गायकवाड (९ वी) व विजय भोसले (१० वी) यांनी पुढाकार घेतला.
    या वेळी वसतिगृह अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत,पाहारेकरी कमलाकर सुरवसे व स्वयंपाकी सौ. पद्मिनी सुरवसे उपस्थित होते. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व बालसंरक्षणाविषयी सजगता निर्माण झाली.
error: Content is protected !!