February 8, 2026

आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी जय्यत तयारी

  • रामेगाव (लातूर) – येथे २५ डिसेंबरला ऐतिहासिक धम्म सोहळा;सिनेअभिनेते गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती
  • लातूर – बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व उपासक-उपासिकांच्या सौजन्याने तसेच भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी महाविहार,धम्म संस्कार केंद्र, सातकर्णी नगर,रामेगाव (ता. जि. लातूर) येथे पूर्ण झाली आहे. ही एकदिवसीय भव्य धम्म परिषद गुरुवार दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
    या धम्म परिषदेच्या सभा मंडपाचे रोपन लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव नरवाडे,उपअभियंता इंजि.संजय सावंत व सरपंच साधना पांडुरंग मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
    गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता डॉ. आंबेडकर चौक, लातूर येथे पंचरंगी धम्म ध्वजारोहण करून पूज्य भिक्खू संघ, बुद्धमूर्ती तसेच बौद्ध उपासक-उपासिकांची भव्य धम्म मिरवणूक निघणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे मुख्य ध्वजारोहणानंतर मिरवणुकीचे समापन होणार आहे.
    यानंतर महाविहार,सातकर्णी नगर, बार्शी रोड,रामेगाव येथे दुपारच्या सत्रात अखिल भारतीय भिक्खू संघ, बुद्धगया चे संघनायक पू. भिक्खू करुणानंद महाथेरो (दिल्ली) यांच्या हस्ते आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन होणार असून भिक्खू धम्मसेवक महाथेरो अध्यक्षस्थानी असणार आहेत.यावेळी महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पू. भिक्खू शिवली महाथेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते सातकर्णी स्मरणिकेचे विमोचन करण्यात येणार आहे.
    या परिषदेच्या विशेष आकर्षणात प्रख्यात सिनेअभिनेते गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख,माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार रमेशप्पा कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर (घुगे), जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, सिद्धार्थ हत्तीहंबीरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    देश-विदेशातून आलेले अनेक पूज्य भिक्खू — भ. शरणानंद महाथेरो, भ. प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, भ. डॉ. यशकाश्यपायन महाथेरो,भ.धम्मानंद महाथेरो, भ. करुणानंद महाथेरो,भ.दयानंद महाथेरो,भ.धर्मपाल थेरो,भ. संघपाल थेरो आदी विविध विषयांवर धम्म देशना देणार आहेत.
  • सायंकाळी धम्म परिषदेच्या समारोपानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक विकास राजा (नागपूर) यांच्या बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
  • या ऐतिहासिक धम्म परिषदेचा लाभ घेण्यासाठी लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी हजारोंच्या संख्येने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे,असे आवाहन परिषदेचे संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
    यावेळी भंते बोधीराज,डॉ.सुधाकर गुळवे,प्रा.डॉ.संजय गवई,प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, विठ्ठल जाधव, प्रा.मा.ना.गायकवाड, पांडुरंग अंबुलगेकर,भीमराव चौदंते,आर. एस.सोनकांबळे,उदय सोनवणे, अनिरुद्ध बनसोडे,ज्योतीराम लामतुरे,राजेश कदम,कुमार सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!