कळंब (माधवसिंग राजपूत) — कळंब नगरपरिषदेच्या सर्वसाधारण निवडणूक २०२५ साठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पार्टी युती, तर शिवसेना (उबाठा),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीचा निकाल दि.२१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब येथे सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.१० टेबलांवर तीन राऊंडमध्ये ही मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे या २२५४ मतांनी विजयी झाल्या.विजयी उमेदवार राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांना ७६८९ मते मिळाली,तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) उमेदवार मुंदडा रश्मी संजय यांना ५४३५,मीनाक्षी श्रीधर भवर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना १७६०, गोरे कविता निवृत्ती (अपक्ष) ५८, बनसोडे मनीषा (अपक्ष) १०६, शेहनाज शेख (रिपब्लिकन सेना) १०३ मते मिळाली. NOTA ला ८३ मते पडली. नगरसेवक पदासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे ९ उमेदवार,तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १ उमेदवार असा महाविकास आघाडीचे एकूण १० उमेदवार विजयी झाले.दुसरीकडे महायुती घटक पक्षांतून शिवसेना (शिंदे) ४ व भाजपा ६ असे एकूण १० उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार हे ८ मतांनी पराभूत, तर शिवसेना (शिंदे) चे माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी हे ६३ मतांनी पराभूत झाले. भाजपाचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.
कळंब नगरपरिषद निवडणुकीत १९८५ मध्ये मुस्ताक काझी हे कमळ चिन्हावर विजयी झाले होते. तब्बल ४० वर्षांनंतर कळंब शहरात कमळ फुलले आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.
या प्रक्रियेदरम्यान तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले, सहाय्यक निवडणूक अधिकारी, मुख्याधिकारी मंजुषा गुरमे, नायब तहसीलदार गोकुळ भराडिया उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड