March 26, 2026

परंडा येथे ‘सोहळा दिव्यांगांचा,सोहळा सन्मानाचा’कार्यक्रम शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

  • परंडा – दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने आयोजित “सोहळा दिव्यांगांचा, सोहळा सन्मानाचा” हा भव्य सन्मान सोहळा परंडा येथील पंचायत समिती सभागृहात शेकडो दिव्यांग बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला.जागतिक दिव्यांग दिन (3 डिसेंबर) निमित्त आयोजित केलेल्या या सांगता समारोप कार्यक्रमात विविध योजनांबाबत मार्गदर्शन,सन्मान आणि नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
    कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. व्यासपीठावर तहसीलदार निलेश काकडे,गटविकास अधिकारी मोहन राऊत,पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले,शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोरख मोरजकर,दिव्यांगांचे आधारस्तंभ उद्योजक रामभाऊ पवार,शाहीर शरद नवले,छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष प्राणजित गवंडी,प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे, भाजपा सरचिटणीस विकास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
    उद्घाटक सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य शासनातील दिव्यांगांसाठी उपलब्ध योजनांची माहिती देत, “दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे,”असे आश्वासन दिले.
    तहसीलदार निलेश काकडे यांनी संजय गांधी योजना, रेशनकार्ड सेवा,तसेच इतर प्रकरणांबाबत माहिती देत,“माझ्या कुटुंबातही एक दिव्यांग असल्याने त्यांच्या अडचणी मला जाणवतात; आपण कधीही तहसील कार्यालयात येऊ शकता,” असे सांगितले.
    गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी घरकुल 5% दिव्यांग कोटा, सेस निधी, आणि पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
    कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून तानाजी घोडके यांनी दिव्यांग उद्योग समूहाच्या उपक्रमांचा आढावा सादर केला. कार्यक्रमात नूतन दिव्यांग उद्योग समूह कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष: विठ्ठल गायकवाड,महिला जिल्हाध्यक्ष: उषा भास्कर पाटील,तालुका अध्यक्ष: तानाजी सांगडे,शहराध्यक्ष: गोरख देशमाने,उपाध्यक्ष: अशोक भराटे,प्रसिद्धीप्रमुख: संतोष कुलकर्णी,तालुका सरचिटणीस: रावसाहेब खरसडे यांचा समावेश असून निवडपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
    तालुक्यातील उत्तम शिंदे,दादा माने,करीम शेख,अनंता सावंत, ज्योती कुलकर्णी,कौशल्या मोहिते, मीना डोरले,नितीन शिंदे,जावेद तांबोळी,तसेच अनेक दिव्यांग बांधवांची उपस्थिती विशेष ठरली.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाहीर शरद नवले यांनी प्रभावीपणे केले. दिव्यांग बांधवांच्या प्रचंड उत्साहामुळे हा सन्मान सोहळा परंड्यात यशस्वीरीत्या पार पडला.
error: Content is protected !!