धाराशिव (जिमाका) – केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजूरी प्रदान केली आहे. या योजनेअंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टोएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरीता 50 लक्ष रुपये, कुक्कुट पालनाकरीता 25 लक्ष रुपये, वराह पालनाकरीता 30 लक्ष रुपये आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी 50 लक्ष रुपये अशी आहे. प्रकल्पाकरीता स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे. या योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायिक, स्वयं सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दुध उत्पादक संस्था, साह जोखीम गट (जेएलजी), सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप आदी घेवू शकतात. या योजनांच्या लाभाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅनकार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत), छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक आदी सादर करणे (अपलोड) अनिवार्य आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी आदी उपलब्ध असल्यास सादर करावे. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना आदी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ http://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाचे संकेतस्थळ http://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेचा जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला