February 8, 2026

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त पापळकर यांचे आवाहन

  • राजकीय पक्ष प्रमुखांसोबत विभागीय आयुक्तांची बैठक
  • छत्रपती संभाजीनगर (विमाका) :-
    १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून,पात्र मतदारांनी पुन्हा नव्याने नाव नोंदविणे आवश्यक आहे.या संदर्भात राजकीय पक्षांनी सहकार्य करावे,असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
    विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच विविध पक्षांचे विभागीय प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
    नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
    विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की,पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक-१८ अर्ज भरावा लागेल.अर्जासोबत पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक सादर करणे आवश्यक असून, अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र/गुणपत्रिका तपासणीसाठी दाखवावी किंवा त्याची स्वसाक्षांकित प्रत अथवा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली प्रत जोडावी.
    भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षांपूर्वी पदवी घेतलेले किंवा समकक्ष पात्रता धारण करणारे पदवीधर नोंदणीस पात्र राहतील.
    अर्ज प्रत्यक्षपणे अथवा टपालाद्वारे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल.तथापि,एकत्रित गठ्ठा स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.मात्र,कुटुंबातील एका सदस्यास इतर सदस्यांचा अर्ज सादर करण्याची परवानगी आहे.
    मतदार नोंदणीसाठी यंत्रणा
    औरंगाबाद विभागातील २०२० च्या निवडणुकीसाठी एकूण ८१३ मतदान केंद्रे (७५० नियमित व ६३ अतिरिक्त) होती. त्यावेळी ३ लाख ५२ हजार ३९६ मतदार नोंदवले गेले होते.
    २०२५ च्या मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मुख्य मतदार नोंदणी अधिकारी असतील. जिल्हाधिकारी व अपर आयुक्त (सा.प्र.) हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. विभागातील १३० अधिकारी सहायक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त झाले असून,१०६ पदनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नायब तहसिलदार (निवडणूक) तसेच छत्रपती संभाजीनगर मनपाचे सहायक आयुक्त यांचा समावेश आहे.एकूण २४५ अधिकाऱ्यांची यंत्रणा मतदार नोंदणीसाठी कार्यरत राहणार आहे.
    कार्यक्रमाची वेळापत्रक
    जाहीर सूचना प्रसिद्धी – मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५
    प्रथम पुनर्प्रसिद्धी – बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५
    द्वितीय पुनर्प्रसिद्धी – शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५
    अर्ज (नमुना १८/१९) दाखल करण्याची अंतिम मुदत – गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५
    हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार यादी छपाई – गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५
    प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी – मंगळवार,२५ नोव्हेंबर २०२५
    दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी – २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५
    दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी छपाई – गुरुवार, २५ डिसेंबर २०२५
    अंतिम मतदार यादी प्रसिद्धी – मंगळवार, ३० डिसेंबर २०२५
    कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पापळकर यांनी केले आहे.
error: Content is protected !!