February 8, 2026

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे शाही उद्घाटन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांची प्रमुख उपस्थिती
  • कोल्हापूर (जिमाका) – मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिला अनावरण करून करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शाही सोहळा पार पडला.
    समारंभाला सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने,वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर,न्यायमूर्ती मकरंद कर्णिक,न्यायमूर्ती शिवकुमार दिगे,न्यायमूर्ती शर्मिला देशमुख,न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर,न्यायमूर्ती भारती डांगरे,कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे,न्यायमूर्ती अनिल किलोर,आमदार,संपादक, जिल्हाधिकारी,आयुक्त,पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सीपीआरसमोर असलेल्या ऐतिहासिक जिल्हा न्यायालयीन इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू झाले असून ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अत्यल्प वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे नूतनीकरण केले. १८७४ मध्ये बांधण्यात आलेल्या या हेरिटेज वास्तूस सर्किट बेंचमुळे नवी झळाळी मिळाली आहे. परिसराचा कायापालट झाल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
    या सर्किट बेंचमध्ये डिव्हिजन बेंच, दोन सिंगल बेंच,रजिस्ट्रार कक्ष, रेकॉर्ड रूम,स्ट्रॉंग रुम,सरकारी वकिलांची कार्यालये, न्यायाधीशांसाठी लॉन्ज, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा,तसेच मध्यस्थी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी २.३० ते ४.३० अशी निश्चित करण्यात आली आहे.
    या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा,सांगली,सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना न्यायप्राप्तीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.वेळ,श्रम व पैशांची बचत होऊन नागरिकांना जलदगतीने न्याय मिळणार आहे. तसेच शिक्षण,उद्योग,व्यापार व कायदा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीत या सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण वाटा राहणार आहे.
error: Content is protected !!