June 20, 2025

सरकार व माथाडी मंडळाचे गलथान कारभाराविरुद्ध माथाडी कामगारांची प्रचंड निदर्शने

  • संभाजीनगर – १९ महिन्याचा कोकण ऍग्रो चा पगार,गोदामात वेळेवर पगार करणे आणि पतंजली सह अन्य आस्थापनात माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी म्हणून, माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड निदर्शने केली.
    मराठवाडा लेबर युनियन – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ,जय किसान आंदोलन हा स्वराज अभियान,शेतकरी शेतमजूर पंचायत इ.संघटनांचे वतीने आयोजित निदर्शनाचे नेतृत्व,महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे,मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड.सुभाष सावंगीकर यांनी केले.
    मालक वर्ग माथाडी कामगारांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी करतात,पगार वेळेवर माथाडी मंडळात भरले जात नाहीत,थकबाकी वसुली तात्काळ केली जात नाही या अशा व अन्य प्रश्नावर माथाडी मंडळ तात्काळ कारवाई करीत नसल्याने,मालक वर्गास माथाडी कायद्याचा धाक थोडाही राहिलेला नाही.त्यामुळे परवड आणि फरफट मात्र काबाडकष्ट करणाऱ्या माथाडी कामगारांची होते आहे.
    या सर्व प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना मागण्याचे निवेदन दिले तेव्हा त्यांनी,सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रश्नांशी संबंधित सर्वांची बैठक आठवडा भरात जिल्हाधिकारी यांच्याकडे लावली जाईल असे आश्वासन दिले.
    यावेळी संयुक्त किसान मोर्चा चे वतीने,शेतकऱ्यावर केले जात असलेले अत्याचार,शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे शेतीमालास हमी भावास कायद्याचे संरक्षण, इ. प्रश्नावरील राष्ट्रपती साठीचे निवेदन ही जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आले.
    हेच निवेदन,माथाडी मंडळाचे अध्यक्ष व कामगार उपायुक्त मा. चंद्रकांत राऊत यांना ही देण्यात आले.तेंव्हा त्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले.
    पगार वेळेवर करणे,काढलेल्या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घेणे,थकबाकी वसूल करणे, वेतन वाढीच्या संपलेल्या कराराचे नूतनीकरण करणे, चुकीचे घेतलेल्या निर्णयाची दुरुस्ती इ.प्रश्न युद्ध पातळीवर मार्गी लावले नाहीत तर, रस्त्यावरील संघर्ष अटळ असून, गरज पडल्यास काम बंद आंदोलन,आमदार – खासदारांचे घरावर/ऑफिस वर मोर्चे/ सत्याग्रह करून जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
    निदर्शनात साथी सुभाष लोमटे व ऍड.सुभाष सावंगीकर यांच्याबरोबरच मध्यप्रदेश येथील माजी आमदार व किसान संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.सुनील, समाजवादी पार्टीचे साथी अयुब खान,साथी रियाज देशमुख, स्वराज अभियान चे साथी शेख खुर्रम,मराठवाडा लेबर युनियनचे साथी छगन गवळी,साथी प्रवीण सरकटे,बाजार समिती संचालक साथी देविदास किर्तीशाही,साथी जगन भोजने,साथी सर्जेराव जाधव,…. इ. प्रमुख सहभाग होता.
error: Content is protected !!