धाराशिव (माध्यम कक्ष) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने मतदान क्षेत्रात मतदार असलेले उद्योगातील कामगार / अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत उद्योग विभागातंर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह,महामंडळे,कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी,कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान केंद्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी.मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.उद्योगातील मतदार हे मतदानापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.मतदान क्षेत्रात असलेल्या कामगार,अधिकारी,कर्मचारी, निवडणूक क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना,खाजगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना,उद्योग विभागातंर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह,महामंडळे,कंपन्या,व संस्था,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी देण्यात यावी.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.
तसेच याबाबत उद्भवणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी धाराशिव येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. संबधित कामगार व कामगार संघटनांनी दूरध्वनी क्रमांक ०२४७२ – २२४३२७ यावर संपर्क साधावा.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील