संभाजीनगर – माथाडी कामगारांचे कायदेशीर व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या उपाययोजना लिखित स्वरूपात दिल्यानंतर, २९ तारखेपासून सूरू असलेले उपोषण आज सायंकाळी स्थगित करण्यात आले. निवडणूक आचार संहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास परवानगी नाकारल्यानंतर,नारळी बाग येथील संघटनेच्या संविधान भवन येथे बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बेमुदत उपोषणात, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व राज्य माथाडी सल्लागार समिती चे सदस्य साथी सुभाष लोमटे आणि मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस अँड.सुभाष सावंगीकर हे बसले होते. कारखाने, शासकीय धान्य गोदाम, बाजार समित्या इ. ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी कामगारांचे कायद्याचे चौकटीतील पण प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत लिखित आश्वासन कामगार उपायुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी दिले. तसेच हे पत्र बेमुदत उपोषण करणाऱ्या साथी सुभाष लोमटे व अँड. सुभाष सावंगीकर यांच्याकडे सुपूर्द केले.
दिलेली आश्वासनात खालील मागण्यांचा सामावेश आहे – बेकायदेशीर पणे काढलेल्या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घेवून, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे,शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांची कंत्राटदारांनी केलेली लूट वसूल करणे , महागाई निर्देशांकाची थकबाकी वसूल करणे तसेच या थकबाकीवरील व्याज वसूल करणे,माथाडी कामगारांचे थकबाकीची सर्व प्रलंबित प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ वसूल करावी यासाठी पत्र देणे,लिकर कारखान्यातील मजुरीस महागाई भत्ता जोडून, ३ वर्षाची थकबाकी तात्काळ वसूल करणे, कोकण ऍग्रो मधील माथाडी कामगारांचा १५ महिन्यापासून थकलेला पगार व्याजासह वसूल करणे इ प्रश्नांचा सामावेश आहे.हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव व कामगार सचिव यांचेशी संपर्क करून मुंबई येथील माजी खासदार हुसेन दलवाई यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी माथाडी मंडळाचे सचिव राजपूत, पवार,जाधव उपस्थित होते. या बेमुदत उपोषण काळात मराठवाडा लेबर युनियन चे अध्यक्ष डॉ.सुधीर देशमुख, ज्येष्ठ विधीज्ञ अड. सेवकचद बाखरीया, महात्मा गांधी भवन चे संचालक प्रा. मच्छिंद्र गोरडे , भेट देवून उपोषण व मागण्यांना पाठींबा दिला. या उपोषण काळातील व्यवस्था चोख पाडण्यात मराठवाडा लेबर युनियन चे उपाध्यक्ष साथी छगन गवळी, कोषाध्यक्ष साथी प्रवीण सरकटे, बाजार समिती संचालक साथी देविदास किर्तीशाही, गोदामाचे साथी जगन भोजने, साथी सचिन पगारे, साथी शेख कलीम शेख रज्जाक, साथी फारुख भाई, साथी सर्जेराव जाधव , साथी भारत गायकवाड, साथी वाघमारे इ कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य झाले.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती