June 19, 2025

दीक्षाभूमीवर आजपासून धम्मदीक्षा सोहळा,भदंत ज्ञानेश्वर मुख्य अतिथी

  • नागपूर ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,दीक्षाभूमीच्या वतीने ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमाचे गुरुवार १० ते शनिवार १२ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा १२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून कुशीनगर (उत्तर प्रदेश) भिक्षु संघाचे अध्यक्ष भदंत ए.ए.बी.ज्ञानेश्वर,महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा,दीक्षाभूमी बुद्धिस्ट सेमिनरीचे भंते आणि दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा मिळावी,यासाठी न्यायालयीन लढा देणारे अँड.शैलेंद्र नारनवरे यांना निमंत्रित केले आहे.
    भंते ज्ञानेश्वर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देणारे महास्थवीर चंद्रमणी यांचे शिष्य होत,अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष, धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी माध्यमांना दिली.
    धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवारी १० ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक व श्रामणेर यांना दीक्षा देतील.धम्मदीक्षेचा हा कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार आहे. त्यानंतर उपासकांना धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरित होईल. शुक्रवारी ११ ऑक्टोबरला ऑक्टोबरला ९ वाजता ससाईंच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण होईल. या वेळी समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येईल,सायंकाळी ६ वाजता प्रबुद्ध बागडे व संचाद्वारे बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमासह नृत्य व नाटक (अंगुलीमाल व आम्रपाली) सादर करण्यात येणार आहे. शनिवारी १२ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता भदंत ससाई यांच्या उपस्थितीत सामुहिक बुद्ध वंदना सायंकाळी ६ वाजता ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम भदंत ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
error: Content is protected !!