धाराशिव -‘फुले आंबेडकरी वाडःमयकोश’ या दलित साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कोशग्रंथाचे प्रकाशन सोमवार दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत प्रख्यात विचारवंत डाॅ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार आहे. या कोशग्रंथाच्या संपादक मंडळात धाराशिवचे दलित साहित्यिक पंडित कांबळे यांचा समावेश आहे.या ऐतिहासिक कोशात धाराशिव भागातील तीस ते पस्तीस दलित साहित्यिकांची नोंद घेण्यात आलेली आहे.प्रसिद्ध दलित साहित्यिक डाॅ.महेंद्र भवरे हे या ग्रंथाचे मुख्य संपादक असून पंडित कांबळे शिवाय सर्वश्री. डाॅ.अशोक इंगळे,राम दोतोंडे, डाॅ. सुनील अवचार,डाॅ.मच्छिंद्र चोरमारे,डाॅ.अशोक नारनवरे,डाॅ. प्रकाश मोगले,डाॅ.भास्कर पाटील आणि डाॅ.ज्ञानेश्वर कांबळे यांचा समावेश आहे. १९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा साडे सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांनी सुरु केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य,आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते आणि दलित साहित्य व या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासिक घटना आहे. याला महात्मा फुल्यांपासूनचा वारसा आहे. त्यांचे एकूण साहित्य आणि समाजकार्याने ही समग्र चळवळ प्रभावित आणि समृद्ध झालेली आहे.हा इतिहास समाजाला,विद्यार्थी,संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा यासाठी “फुले आंबेडकरी वाङमय कोश” निर्माण करण्यात आला आहे. तब्बल १४२८ पानांच्या या कोशात आंबेडकरपूर्व,आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील सुमारे ५६० साहित्यिकांचा यात समावेश आहे.पंडित कांबळे यांचा संपादक मंडळात समावेश असल्याने त्यांचा योगीराज वाघमारे,जयराज खुने, नितीन तावडे,बालाजी तांबे,अभिमन्यू इंगळे,राजेंद्र धावारे,व्ही.एस.गायकवाड,डी.के.शेख,डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी व शहरातील सर्व साहित्यिक मित्र यांनी पंडित कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान