धाराशिव – पावसात मंदिराच्या मागील बाजुची भिंत पत्र्याच्या शेडवर कोसळून २० शेळ्या,६५ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तसेच शेडही उद्ध्वस्त झाले असून या दुर्घटनेत शेळीपालन करणार्या विधवा महिलेचे सुमारे ५ लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.धाराशिव शहरातील सांजावेस भागात रविवारी (दि.1) रात्री ही दुर्घटना घडली. धाराशिव येथील सांजावेस भागातील श्रीमती अंबिका दत्ता दोडमिसे या विधवा असून त्या वडील वामन दशरथ लोणारी (मोळेकर) यांच्या घरी वास्तव्यास आहेत. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून ३ लाख ५० हजार रुपये कर्ज घेऊन शेळीपालन व कुकुट्ट पालन व्यवसाय सुरु केलेला आहे. दि.१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या पावसात त्यांनी शेळीपालन व कुकुट्टपालन करण्यासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजुची भिंत कोसळली. या दुर्घटनेत शेडमधील २० शेळ्या-बोकड,६५ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तसेच १५ बाय ७० आकाराचे पत्र्याचे शेडही उद्ध्वस्त झाले. शेळ्या,कोंबड्या आणि पत्र्याचे शेड असे मिळून अंदाजे ५ लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान सोमवारी (दि.२) धाराशिव शहरचे तलाठी बालाजी लाकाळ यांनी पंचासमक्ष दुर्घटनेचा पंचनामा करुन तहसिलदारांकडे अहवाल सादर केला आहे. बँकेकडून कर्ज घेऊन सुरु केलेल्या व्यवसायावर निसर्गाचा कोप झाल्याने विधवा महिलेवर आर्थिक संकट कोसळले आहे. सदरील महिलेला संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून भरीव मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी