धाराशिव (जि.मा.का.)- धाराशिव जिल्हयातील ८ तालुक्यात १२ ग्राम पंचायतीत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १९ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडला . यामध्ये धाराशिव तालुक्यातील बेंबळी, ढोकी आणि तेर, कळंब तालुक्यातील शिराढोण व येरमाळा, वाशी तालुक्यातील तेरखेडा, भुम तालुक्यातील ईट, परंडयातील आसु तसेच लोहारा तालुक्यातील माकणी, तुळजापूर तालुक्यातील अणदुर व जळकोट, उमरगा तालुक्यातील गुंजोटी या ग्राम पंचायतीचा समावेश आहे. धाराशिव तालुक्यातील तेर या कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.औताळे, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त संजय गुरव, सी.एम.फेलो चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील युवक – युवतींना किमान 300 ते 500 तासापर्यंतचे (कोणत्याही एका कोर्सचे मोफत प्रशिक्षण) कौशल्य विकास प्रिशिक्षण दिले जाणार. यामध्ये कृषी, फुड प्रोसेसिंग बँकीग, इलेक्ट्रीकल, टेलिकॉम, मिडीया, आयटी, ॲटोमोटिव, ॲप्रेल, इ.सेक्टरचा समावेश करण्यात आला आहे. 2023-2024 या वर्षात या केंद्रांना प्रत्येकी 100 प्रशिक्षणार्थ्यांचे लक्ष्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात प्रति केंद्र 50 प्रशिक्षणार्थी प्रमाणे एकुण 12 केंद्रासाठी 600 इतके लक्ष्याची वर्क ऑर्डर वितरीत केलेली आहे. यासाठी धाराशिव जिल्हयासाठी दोन सेवा पुरवठादार प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे. उदघाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रासाठी संबंधित तालुक्याचे आय.टी.आय. चे प्राचार्य यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करुन त्यांच्या सोबत 4 लोकांची टीम देण्यात आली होती. तसेच आय.टी.आय. चे विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात आले होते. तेर येथील रुक्मीणी मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.
More Stories
कळंब येथे मराठा युवकांचे आरक्षणासाठी साखळी उपोषण
विज्ञानामुळेच सर्जनशीलता वाढीस लागते-सुशिल फुलारी