प्रिय कबू, आज पहाटेपासून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा येत होत्या.जशा शुभेच्छा वाढायला लागल्या.तसा तुझ्या आठवणींचा उमाळा वाढत गेला.तू इहलोकिचा निरोप घेतलास आणि मुक्त झालीस.पातीवृत्तेच्या जोरावर तुझं जाणं सौभाग्याचं झालं.तू मुक्त झालीस.तुला सौभाग्याचं मरण यावं म्हणून कितीतरी मैत्रिणीकडे तू व्यक्त झाली होतीस.ते मला समजलं जरी असतं तरी मी तुझ्या जाण्याला थांबवलं असतं.तू मुक्ती मिळविलीस,ते तुझं भाग्य समजलस.पण आम्ही मात्र दुर्भागी झालोत.तुझ्या प्रेमाला पोरके झालो. मोठे भाऊ गेले. बापू गेले.मग वडील.मागे मागे आई आणि नंतर तुही निघून गेलीस.सोसाट्याचा वारा सुटावा, भयभीत करणारं वादळ यावं,रखरखत्या उन्हाळ्यात घराचा चकना चूर होऊन जावा.स्वप्न मातीमोल व्हावं. लेकरं बाळं उघड्यावरती यावीत.अशीच केविलवाणी अवस्था माझ्यासोबत आपल्या घरातल्या सगळ्यांची झालीय. भाऊजी आजारी पडल्यानंतर तुझ्या मनाची घालमेल होत असताना दिसत होती.परंतु टोकाचा निर्णय घेशील असे कधीच वाटलं नाही.आज तुझी लेकरं,लेक,नातवंडे सगळी- सगळी पोरकी झालीत.हे सगळं दुःख आज तरी सोसवत नाही.जीव गुदमरतोय. कबू जेव्हा दोन भावंडं,आई-वडील गेले. तेव्हा तू माझ्या पाठीशी होतीस.आभाळमाया घेऊन,मायेचं पांघरूण घालायला तयार होतीस.एवढं मोठं दुःख पेलण्याचं बळ तुझ्याकडून मला मिळालं.तेव्हा इतकं दुःख जाणवलं नाही. कबू तुला आठवतय का गं!!! तू एकदा म्हनाली होतीस!!! मोठे भाऊ गेल्यानंतर माझा पाठिंबा गेला. मन हरल्यासारखं झालं.तशीच अवस्था आज माझी झालीय. माणसं म्हणतात ना…दुःख झालं तर वडीलधाऱ्या माणसाच्या गळा लावून मनसोक्त रडावं.व्यक्त व्हावं, बोलावं.परंतु आज माझ्यासाठी वडीलधारं म्हणून कोणीच राहिलं नाही.आता कोणाच्या गळ्याला लागावं.आलेला हुंदका कसा सैल करावा. कोणापुढे व्यक्त व्हावं.असं ठिकाणच उरलं नाही.दाटून आलेला कंठ आतल्या आत गुदमरून जातो आहे गं…. कबू आज रक्षाबंधन हा सण जगभर मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा होत आहे.भावंड भेटत असतील.बहिणी भावाला राख्या बांधत असतील.भावासाठी औक्षण करत असतील. त्या सर्वांचं भाग्य किती थोर आहे ना गं…. पूर्वी कधी कधी तू आवर्जून मला बोलायचीस,आण्णा !!! राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला तू न विसरता येत जा…तू नाही आलास की मन सैरावैरा होतं.अनेक मैत्रिणीचे भाऊ आले आणि तू नाही आलास की मन अस्वस्थ होऊन जातं.दुःखाचा उमाळा येतो.उगीच मनाला अपमानित झाल्यासारखं वाटतं.रोज तुझी वाट पहावी.जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत…आज येशील,उद्या येशील म्हणून सारखं मी वाटेकडे टक लावून पहात रहावं. कोणाची गाडी दिसली की माझं भाऊ आला असंच वाटायचं.तो लागलेला लळा, जिव्हाळा आणि ते प्रेम त्या आठवणी आल्या की मन अस्वस्थ होऊन जातं. गुदमरून जातं. कबू मला सांग!!!आज मी कोणाकडे जाऊ गं? कुठे जाऊ? कोणाच्या दारात उभा राहू? पवित्र नात्याचे बंध घेऊन भाऊ म्हणून दारात कोण उभा करेल?भाऊ म्हणून कोण स्वीकारेल? तुझ्या इतकं प्रेम, पैसे,प्रॉपर्टी, देऊन तरी मिळेल का गं? काही क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. कबू तुझ्या आठवणींत मी हंबरडा फोडला तरी कोण ऐकेल का? कोण समजून घेईल माझ्यातली अस्वस्थता.माझ्यातल्या वेदना, माझ्यातलं निराधारपण कोण स्वीकारेल.निसर्गातील सर्व शक्तीने प्रेम,माया, ममता कशी निर्माण करून ठेवलीय पहा ना!!!. कबू… खरं सांगू तुला. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही.परंतु चुकून पुनर्जन्म होत असेल तर मोठी बहीण म्हणून पुन्हा जन्माला ये…. त्या पवित्र अशा संत गोरोबाकाकाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, तेरणा काठावर वसलेल्या सुंदर आणि अप्रतिम,पवित्र अशा सातेफळ गावात, त्याच आई-वडिलांच्या पोटी पुन्हा जन्म घ्यायला मला आवडेल. कबू….ए कबू…. अशी गप्प का? येशील का ग, पुन्हा जन्म घेऊन???. तू सांगशील ती तपश्चर्य मी करेन……. कबू ये कबू…. हो म्हण ना गं………😢😢😢😢😢😢
*दाटून हुंदक्याला* *नेत्रात सैल केले* *बहिणीस माझ्या* *हे पत्र समर्पिले.*
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश