धाराशिव (जिमाका) – 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 1 ते 7 ऑगस्ट 2024 दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहादरम्यान विविध घटकातील नागरिकांसाठी शिबिरे,उपक्रम व महसूल अदालती आयोजित करण्यात येणार आहे.विविध योजनांची नागरिकांना माहिती देऊन महसूल विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
1 ऑगस्ट 2024 रोजी महसूल दिनाचे आयोजन करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र /जन्म दाखला सक्षम,सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड,आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल ॲप/ सेतू सुविधा केंद्र येथून ऑनलाईन भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असणारी काही कागदपत्रे, दाखले आपले सरकार पोर्टलद्वारे, महा-ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येतात.या योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाशी समन्वय साधून पोर्टल व डेटा सेंटर सुरळीतपणे सुरू राहील.या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार सेवा केंद्र/ई-सेवा केंद्र/सेतू केंद्र/तहसील कार्यालय इत्यादी ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या महिला अर्जदारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना मदत व सहकार्य करण्यात येणार आहे.
2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सेवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांना प्राप्त व्हावा,यासाठी अधिवास प्रमाणपत्र,आधार कार्ड इत्यादी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.यासाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहे,त्यांना राज्य आणि देशातील तीर्थस्थळांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून मिळणार आहे.या योजनेच्या लाभासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड,आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त व्हावा यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल ॲप/सेतू सुविधा केंद्र येथून भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त व्हावा,यासाठी विशेष कक्ष तयार करून अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार आहे.सेतू केंद्र आणि तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना योग्य ते मदत आणि सहकार्य करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत जिल्हा, तालुकास्तरावर व्यापक प्रसिद्धी देऊन त्याची जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने संबंधित विभागासोबत समन्वय साधून योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचे दाखले शासनामार्फत ओळख पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
4 ऑगस्ट – स्वच्छ व सुंदर माझी कार्यालय -यासाठी विशेष मोहीम राबवून जिल्हास्तरावरील,तालुका स्तरावरील,मंडळ स्तरावरील व ग्राम स्तरावरील कार्यालयाची व परिसराची साफसफाई करण्यात येणार आहे. कार्यालयाचे अभिलेख व दस्तऐवज यांचे वर्गीकरण व व्यवस्थापन निंदनीकरण व महत्त्वाच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग व संगणकीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा,यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे,शुल्क सक्षम,सक्षम प्राधिकारी इत्यादी माहिती दर्शवणारे फलक अद्यावत करण्यात येणार आहे.शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. विविध कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या विभाग प्रमुख/कर्मचारी यांची नावे व संपर्क असलेले फलक व माहिती पुस्तके अद्यावत करण्यात येणार आहे.कार्यालयातील अनावश्यक फर्निचर,कागदपत्रे विहित कार्यपद्धत अवलंब दुरुस्त व आवश्यकतेनुसार नष्ट करण्यात येणार आहे.
5 ऑगस्ट – ” सैनिक हो तुमच्यासाठी ” राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी,सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असणारे,महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले/ प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार आहे.संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना घरासाठी /शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे.
6 ऑगस्ट – ” एक हात मदतीचा- दिव्यांगाच्या कल्याणाचा ” दिव्यांग व्यक्तीकरिता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले/प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभांच्या अनुषंगाने जिल्हा/ तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. अनाथ मुले -मुली आई-वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय/निमशासकीय/शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.तसेच अनाथ मुलांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार आहे.
7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत,सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या दिवशी महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,नायब तहसीलदार, अव्वल कारकून,मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक,तलाठी,पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेला सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय तहसीलदार यांनी व्यक्तिशा त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या निकाली काढण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना देऊन आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहे.महसूल यंत्रणेकडून विविध कार्यक्रमाच्या सात दिवसाच्या आयोजनातून महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयामध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश