February 9, 2026

राज्य लोकसेवा 2022 च्या परीक्षेत सारथी संस्थेच्या 175 विद्यार्थ्यांचे यश

  1. धाराशिव (जिमाका) – छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे संस्थेमार्फत मराठा,कुणबी, कुणबी-मराठा,मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.
    20 मार्च- 2024 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षा-2022 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.सारथी पुणेमार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा प्रशिक्षण उपक्रमातील 175 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यशस्वी 175 विद्यार्थ्यांमधील 13 विद्यार्थी यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. 9 विद्यार्थी पोलीस उपअधीक्षक पदावर,8 विद्यार्थी तहसीलदार पदावर, 4 विद्यार्थी गटविकास अधिकारी पदावर, 4 विद्यार्थी शिक्षणाधिकारी पदावर, 19 विद्यार्थी सहाय्यक आयुक्त राज्य कर पदासाठी अशाप्रकारे 75 विद्यार्थ्यांची निवड वर्ग एक पदासाठी व 100 विद्यार्थ्यांची निवड वर्ग दोन पदासाठी झाली आहे.सारथी संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यापैकी पुणे जिल्हा 36, सोलापूर जिल्हा 22, अहमदनगर 21 सातारा 14, सांगली 11 धाराशिव 9,छत्रपती संभाजीनगर 8, बीड 8, कोल्हापूर 6, लातूर 6,बुलढाणा, नांदेड व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी 4. जळगाव,ठाणे जिल्ह्यातील प्रत्येकी 3,अमरावती,धुळे,जालना,मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी 2 व अकोला,गडचिरोली,नागपूर,नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा निवड यादीत नाव झळकले आहे.
    सारथीमार्फत प्रायोजित विद्यार्थ्यांपैकी यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा परीक्षा 2020 द्वारे 70 विद्यार्थी व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा 2021 द्वारे 103 विद्यार्थी यांची निवड झाली आहे.त्यामुळे एकूण सारथीमार्फत प्रायोजित एकूण 348 विद्यार्थीची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) द्वारे वर्ग एक व वर्ग दोन पदासाठी झाली आहे.
    छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते.लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सारथी संस्था प्रयत्नशील आहे.
    सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (भा.प्र.से. से.नि.) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात आपला ठसा उमटावा,अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिल्या आहेत.
error: Content is protected !!