धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – भारताच्या संविधानाने नागरिकांना श्रद्धेचे स्वातंत्र्य दिले असले,तरी त्याचबरोबर चिकित्सा करण्याचे व प्रश्न विचारण्याचे कर्तव्यही दिले आहे.त्यामुळे श्रद्धेलाही प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲड.असीम सरोदे यांनी येथे केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धाराशिव शाखेच्या वतीने शुक्रवार,दि.३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित “कायदा व राजकारणातील भोंदूगिरी” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. पुढे बोलताना ॲड.सरोदे यांनी न्यायव्यवस्थेतील वास्तव अधोरेखित करताना सांगितले की,कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या न्यायाधीशांपासून ते वकिलांपर्यंत अनेकजण अंधश्रद्धांच्या प्रभावाखाली आहेत.सार्वजनिक जीवनात कर्तव्य पार पाडताना अंधश्रद्धांबाबत त्यांचे वर्तन कसे असते,याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. तसेच सध्याच्या राजकारणात वाढत चाललेल्या भोंदूगिरीवर त्यांनी जोरदार टीका करत, सर्वच राजकीय पक्षांतील काही नेते या प्रवृत्तीत गुंतले असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,माजी मुख्याध्यापक पडवळ,एम.डी. देशमुख,ॲड.जयंत जगदाळे, ॲड.बापू काजळे,धर्मवीर कदम, ॲड.राज कुलकर्णी,पत्रकार रवींद्र केसकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.अस्मिता बालगावकर व चंद्रकांत उळेकर यांनी चळवळीची गाणी सादर केली.प्रास्ताविक ॲड.रवींद्र मैंदाड यांनी केले,तर कार्यक्रमाची भूमिका डॉ.अस्मिता बालगावकर यांनी स्पष्ट केली.सूत्रसंचालन ॲड.राम यांनी केले आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत उळेकर यांनी व्यक्त केले. या व्याख्यानासाठी धाराशिव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण
एमबीए/एमएमएस – सीईटी परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ; केंद्र परिसरात कलम १६३ लागू
‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला धाराशिवात उत्स्फूर्त प्रतिसाद