कळंब – कळंब शहरातील गरजू नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून, “प्रत्येक पात्र कुटुंबाला हक्काचे पक्के घर मिळवून देणारच” अशी ठाम ग्वाही नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत कळंब शहरातील ११० पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी शासनाकडून सुमारे अडीच लाख रुपयांचे अनुदान तीन टप्प्यांमध्ये वितरित केले जाते. यामध्ये पहिला हप्ता १ लाख रुपयांचा असून,उर्वरित रक्कम बांधकामाच्या प्रगतीनुसार दिली जाते. नगरपरिषद प्रशासनाने योजनेची अंमलबजावणी गतीमान करत आतापर्यंत ४५ लाभार्थ्यांना पहिला व दुसरा टप्पा मिळून ९१ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम प्रगतीपथावर असून काही बांधकामे प्लिंथ स्तरापर्यंत पूर्ण झाली आहेत. याबाबत बोलताना नगराध्यक्षा कापसे म्हणाल्या, “प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे आणि त्यांचे घरकुल बांधकाम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. तसेच बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्ध करून देण्यासाठीही नगरपरिषद सहकार्य करत आहे.” यावेळी उपनगराध्यक्ष लखन गायकवाड,सभापती भूषण करंजकर,हर्षद अंबुरे,अभियंता सुशील शेळके यांच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी