March 28, 2026

नवतेजस्विनी महोत्सवात महिला उद्योजकतेची झेप;दोन दिवसांत ७ लाखांहून अधिक विक्री

  • धाराशिव (जिमाका) – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’अंतर्गत उस्मानाबाद क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ येथे दि.२७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान ‘नवतेजस्विनी महोत्सव’ उत्साहात सुरू आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दि.२७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.
    या महोत्सवात जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री स्टॉल उभारण्यात आले असून एकूण ४२ स्टॉल्सचा सहभाग आहे.गावरान तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत,दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड, कुरडई,शेवया,मनुके,शोभेच्या वस्तू,मूर्ती,फ्लॉवर पॉट,रेडीमेड कपडे, धान्य व कडधान्य अशा विविध उत्पादनांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
    महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी धाराशिवकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विशेषतःगावरान अंडी,साजूक तूप,काळा मसाला,जात्यावरच्या डाळी,विविध प्रकारच्या शेवया आणि इतर खाद्यपदार्थांना नागरिकांची मोठी पसंती मिळाली.या दोन दिवसांत सुमारे ७ लाख १२ हजार रुपयांची विक्री झाल्याने महिला बचतगटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे दिसून आले.
    हा महोत्सव महिला बचतगटांसाठी हक्काची बाजारपेठ ठरत असून,अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोन ते तीन वेळा आयोजित करावे, अशी मागणी स्टॉलधारक महिलांनी व्यक्त केली आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक सबलीकरणाची संधी मिळत असून त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळत आहे.
    दि.२९ मार्च २०२६ रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महिला बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर (माविम) यांनी केले आहे.
error: Content is protected !!