March 28, 2026

छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू

  • कळंब – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा आणि नागरिकांच्या त्रासाचा प्रश्न अखेर गंभीरपणे घेत नगरपालिकेने आज सकाळपासून धडक कारवाई सुरू केली.
    सकाळी लवकरच नगरपालिका प्रशासनाचे पथक मोजक्या पोलीस बंदोबस्तासह चौकात दाखल झाले.रस्त्यावर आणि पदपथांवर उभारण्यात आलेले अनधिकृत गाळे,हातगाड्या तसेच इतर अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
    कारवाईदरम्यान काही ठिकाणी किरकोळ विरोध झाला,मात्र प्रशासनाने ठाम भूमिका घेत अतिक्रमण हटवण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही.
    गेल्या काही दिवसांपासून या चौकात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली होती.अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले होते,त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली होती.विशेषतःपादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या.
    नगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे आता चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेकांनी प्रशासनाने उशिरा का होईना, पण योग्य पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया दिली.
    दरम्यान,ही मोहीम केवळ एका चौकापुरती मर्यादित न राहता शहरातील इतर प्रमुख रस्ते आणि चौकांमध्येही टप्प्याटप्याने राबवली जाणार आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
error: Content is protected !!