कळंब (माधवसिंग राजपूत) – कळंब शहरातील मांजरा नदीकाठी वसलेले शंभू महादेव (मोठा महादेव) हे शिवभक्तांचे ग्रामदैवत मानले जाते.या पुरातन मंदिराशी हजारो भाविकांची श्रद्धा जोडलेली असताना,मंदिराकडे जाणारा रस्ता व पूल यंदाच्या महापुरात वाहून गेल्याने भक्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.चैत्र एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना,प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मार्ग दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी शिवभक्तांकडून होत आहे. या मंदिरात दर सोमवारी, अमावस्येला तसेच विशेष धार्मिक दिवशी महिला-पुरुषांची मोठी गर्दी असते.पूर्वी चैत्र एकादशीला येथे भव्य यात्रा भरत असे.मात्र १९८० साली मांजरा नदीवर धनेगाव येथे धरण बांधण्यात आल्यानंतर हे मंदिर बॅकवॉटर क्षेत्रात आले.परिणामी,धरण भरल्यानंतर मंदिर परिसरात पाणी साचते आणि ते मार्चपर्यंत कायम राहते. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर असलेला ओढा नदीला मिळत असल्याने रस्त्यावर नेहमीच पाणी साचते. या ठिकाणी नळ्या टाकून तयार करण्यात आलेला छोटा पूलही बहुतांश वेळा पाण्याखाली असतो. यावर्षी आलेल्या महापुराने हा पूल आणि रस्ता पूर्णपणे वाहून नेल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. सध्या भक्तांना मंदिरात जाण्यासाठी अत्यंत अरुंद आणि धोकादायक वाट वापरावी लागत आहे. एका बाजूला खोल नदीपात्र आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा प्रवाह असल्याने अपघाताची भीती कायम आहे.विशेषतः महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. चैत्र एकादशी (दि. २९ मार्च) निमित्त हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने रस्ता व पूल दुरुस्त करावा,अशी मागणी जोर धरत आहे.तसेच मंदिर मार्गावरील बंद पडलेली वीज व्यवस्था त्वरित सुरू करून भाविकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान,मांजरा नदीतील बॅकवॉटर आणि नदीचे खोलीकरण यामुळे या परिसरात वर्षभर पाणीसाठा उपलब्ध असतो.त्यामुळे या ठिकाणाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करून नदी घाट उभारावा, अशीही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे,कळंब नगर परिषद निवडणुकीदरम्यान महायुती तसेच भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नदी घाट, मंदिर रस्ता आणि पूल बांधणीची आश्वासने दिली होती.मात्र अद्यापही ती केवळ कागदावरच असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. आता चैत्र एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन जागे होणार का, की भाविकांना जीव धोक्यात घालूनच दर्शन घ्यावे लागणार? असा सवाल संतप्त शिवभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
More Stories
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच