March 27, 2026

“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – शहरातील रस्ते आता वाहतुकीसाठी नव्हे तर मृत्यूची वाट पाहणारे सापळे बनले आहेत,याची जिवंत साक्ष अहिल्याबाई होळकर चौकात घडलेल्या भीषण अपघाताने दिली.५५ वर्षीय शमीम शेख या निष्पाप महिलेचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला — या मृत्यूला जबाबदार कोण?
    ईदच्या आनंदात लेकीला भेटायला आलेल्या शमीम शेख यांचा प्रवास थेट मृत्यूकडे वळला. रस्ता ओलांडताना अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या मार्गात त्या अडकल्या आणि भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. डोक्यावरून गेलेल्या चाकांनी जागीच त्यांचा जीव घेतला.हा अपघात नव्हे,तर थेट व्यवस्थेचा खून असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
    शहरातील प्रमुख चौक — छत्रपती शिवाजी महाराज चौक, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि अहिल्याबाई होळकर चौक — हे सध्या अतिक्रमणखोरांच्या ताब्यात गेले आहेत.हातगाड्या, फेरीवाले,अनधिकृत दुकाने यांनी रस्त्यांचा गळा घोटला आहे. पादचारी चालण्यासाठी जागा नाही,वाहनांना वळसा घ्यायला रस्ता नाही — मग अपघात होणार नाहीत तर काय?
    प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे “घटना घडल्यानंतर” जागे होणार का? नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत,पण अतिक्रमण हटवण्याच्या कारवाया फक्त कागदावरच दिसतात.प्रत्यक्षात मात्र अतिक्रमणखोरांची मक्तेदारी दिवसेंदिवस वाढतच आहे.
    “आज शमीम शेख गेल्या,उद्या कोण?” हा सवाल आता प्रत्येक कळंबकराच्या मनात घर करून बसला आहे.जर प्रशासनाने अजूनही डोळेझाक केली,तर अशा घटना पुन्हा घडणार यात शंका नाही.
    ही केवळ अपघाताची बातमी नाही,तर निष्क्रिय व्यवस्थेच्या तोंडावरचा जोरदार चपराक आहे. आता तरी प्रशासन जागं होणार का,की अजून किती बळी हवेत?
error: Content is protected !!