आजच्या वेगवान,आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात पारंपरिक मूल्ये, संस्कृती आणि सामाजिक परंपरा जपणे ही मोठी कसरत बनली आहे.बदलत्या जीवनशैलीत अनेक समाजांनी आपल्या परंपरांकडे पाठ फिरवली असताना,कासार समाज मात्र आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून ठेवत असल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. वर्षभरात पाडव्याच्या अगोदर येणारी अमावस्या आणि पंचमी हे दोन दिवस कासार समाजासाठी केवळ सण नसून ती त्यांच्या सांस्कृतिक ओळखीची जपणूक करणारी परंपरा आहे.या दिवशी संपूर्ण समाज आपले सर्व व्यवहार बंद ठेवून पारंपरिक पद्धतीने सण साजरे करतो. ‘व्यवसायापेक्षा परंपरा मोठी’ हा संदेश देणारी ही कृती आजच्या भौतिकवादी युगात विशेष अधोरेखित होते. कासार समाजाचा इतिहास पाहिला तर कष्ट,कौशल्य आणि कलात्मकतेचा संगम दिसून येतो. पितळ,तांबे,बांगड्या तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय त्यांनी पिढ्यान्पिढ्या जपला आहे.हा व्यवसाय केवळ उपजीविकेचे साधन नसून सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. मात्र,औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे या पारंपरिक व्यवसायास मोठे आव्हान निर्माण झाले आहे.बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या वस्तूंमुळे कासार समाजाच्या कष्टमूल्याला अपेक्षित स्थान मिळणे कठीण झाले आहे,ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने कासार समाजाची श्रद्धा अत्यंत दृढ असून कालिंका देवी हे या समाजाचे प्रमुख आराध्य दैवत मानले जाते. या देवीप्रती असलेली भक्ती, पूजाविधी आणि सण-उत्सवांमधून समाजाची धार्मिक एकजूट स्पष्टपणे दिसून येते. ही श्रद्धाच समाजाला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती ठरते.तरीही, या सर्व आव्हानांवर मात करत कासार समाजाने आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू ठेवली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण, नवे व्यवसाय आणि तंत्रज्ञान स्वीकारत त्यांनी प्रगतीची वाट धरली आहे. यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर समतोल या समाजाने साधलेला दिसून येतो.कासार समाजाचे राहणीमान हे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक एकोप्यावर आधारित आहे. सण-उत्सव, धार्मिक विधी आणि सामाजिक कार्यक्रमांमधून समाजातील एकजूट दृढ होत असल्याचे दिसते. ही एकजूटच त्यांची खरी ताकद आहे.आज गरज आहे ती अशा परंपरा जपणाऱ्या समाजांकडे केवळ कौतुकाने पाहण्याची नव्हे, तर त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची. शासनाने आणि समाजाने मिळून या कलेचे जतन करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, अशा अनेक परंपरा काळाच्या ओघात लुप्त होण्याचा धोका आहे.
कासार समाजाने जपलेली परंपरा ही केवळ त्यांच्या समाजापुरती मर्यादित नसून ती आपल्या एकूणच सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. या परंपरेचे जतन करणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे.
अशी माहिती कळंब शहरातील कासार समाजाचे व्यावसायिक धनंजय (आबा) नानजकर यांनी ‘साक्षी पावनज्योत’शी बोलताना व्यक्त केली.
More Stories
सभापती राजश्री वरपे यांचा सन्मान; ‘साक्षी पावनज्योत’ अंकाचे सप्रेम प्रदान
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन;कार्यकारिणी जाहीर
कल्याण-सीएसएमटी मार्गावरील सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा; मराठी साहित्य स्टॉल्सचीही मागणी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे