March 18, 2026

कल्याण-सीएसएमटी मार्गावरील सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा; मराठी साहित्य स्टॉल्सचीही मागणी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

  • नवी दिल्ली – मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या १५ डब्ब्यांच्या करण्यात याव्यात,अशी ठोस मागणी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.यासोबतच रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी केंद्र सरकारकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
    खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले की,कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुमारे ८० टक्के प्रवासी रोज लोकलने प्रवास करतात.त्यामुळे वाढती गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे अत्यावश्यक आहे.तसेच प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, दिवा-सीएसएमटी जलद लोकल सुरू करणे,कोपर-वसई मार्गावरील फेऱ्या वाढवणे आणि कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी त्यांनी केली.
    यासोबतच प्रत्येक रेल्वे स्थानकावर मराठी साहित्य विक्रीसाठी स्टॉल्स सुरू करण्याची आगळीवेगळी मागणीही त्यांनी मांडली.यामुळे मराठी भाषा व साहित्याचा प्रसार होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    रेल्वे प्रकल्पांबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की,कल्याण मतदारसंघात सध्या ५ ते ६ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी व सहावी मार्गिका पूर्ण झाली असून कल्याण ते अंबरनाथ तिसरी-चौथी मार्गिका सुरू आहे. मात्र ठाणे ते सीएसएमटी दरम्यान पाचवी व सहावी मार्गिका अद्याप प्रलंबित असून ती तातडीने पूर्ण करावी,अशी मागणी त्यांनी केली.
    या कामासाठी भूसंपादन, झोपडपट्टी पुनर्वसन आणि नागरिकांचे पुनर्वसन या प्रश्नांवर रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकार व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ठोस धोरण आखावे,असेही त्यांनी सुचवले.
    राज्यात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपयांची रेल्वे कामे सुरू आहेत. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. तसेच कल्याण यार्ड रिमॉडेलिंगसाठी ८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
    हायस्पीड रेल्वे प्रकल्पांचा उल्लेख करताना त्यांनी मुंबई-पुणे व पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉर लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच बुलेट ट्रेन व दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
    इतिहासाचा संदर्भ देताना महात्मा गांधी यांनी १९१६ मध्ये रेल्वेतील असुविधांवर भाष्य केले होते, असे सांगत २०१४ पर्यंत परिस्थिती फारशी बदलली नव्हती, अशी टीकाही त्यांनी केली. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे क्षेत्रात मोठे बदल घडून आले असून वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्या सुरू झाल्या, असे त्यांनी सांगितले.
    यावेळी त्यांनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल तसेच विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही विशेष आभार मानले.
error: Content is protected !!