कळंब (माधवसिंग राजपूत ) – चालू हंगामात वातावरणातील अचानक बदलामुळे कळंब तालुक्यातील आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,सन २०२६ च्या चालू हंगामात आंबा बागांना मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता.मात्र,वातावरणातील अचानक बदल,तापमानातील चढउतार व तीव्र उष्णतेमुळे आंबा बागांवरील मोहोर मोठ्या प्रमाणावर करपून गेला.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.याशिवाय उरलेले आंबेही तीव्र उष्णतेमुळे गळून पडत असल्याने यावर्षी उत्पादन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात येते. वातावरणातील बदलामुळे या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोकण विभागात आंबा पिकांच्या नुकसानीसाठी जो निकष लावला जातो,तोच निकष मराठवाड्यातील आंबा पिकांसाठी लागू करावा,अशीही मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. दरम्यान,यावर्षी अनेक गावांमध्ये पावसाअभावी अवर्षणसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागा व वृक्ष जगविणे कठीण झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.त्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून देण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनावर तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रणित डिकले,प्रताप डिकले,भागवत शिंदे,अमर चोंदे,मनोज थोरात, तात्या लोमटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई;पालकमंत्री, धाराशिव;जिल्हाधिकारी, धाराशिव तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यासाठी तालुक्यातील आंबा पिक उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
दादर रेल्वे स्थानकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी; कळंब येथे लोजपा (रामविलास)चे धरणे आंदोलन
नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पालकांचा विश्वास वाढवा; प्रवेशसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा – डॉ.अशोकराव मोहेकर
मच्छिंद्र दादा गायकवाड युवा प्रतिष्ठानची भीम जयंतीसाठी जय्यत तयारी;नियोजन बैठकीत कार्यकारिणीची निवड