कळंब – धाराशिव जिल्हा केंद्र सरकारने आकांक्षीत जिल्हा म्हणून निवडलेला असताना येथे वाढत चाललेली दारूची व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. दारूच्या व्यसनामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कष्टकरी व युवक वर्ग उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबांचे संसार मोडीत निघत आहेत. दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे, तसेच महिलांवर अत्याचाराच्या घटनाही वाढत असून अनेक महिलांना अकाली वैधव्य येत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात तातडीने वैध व अवैध दारू विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी,अशी मागणी दारू मुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन संघटनेचे संस्थापक प्रमुख संयोजक Bhai Rajanikant (वर्धा) यांच्या उपस्थितीत कळंब येथील उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे १२ मार्च रोजी सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कठोर दारूबंदी कायदा लागू करण्यात यावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी. राज्यातील सर्व दारू उत्पादक कारखानेही बंद करण्यात यावेत. दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तसेच शेती, घर किंवा व्यवसाय विकावा लागलेल्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच दारू व इतर व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती समित्या तातडीने स्थापन करून त्यांच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात. ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करून सदस्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर माधवसिंग राजपूत, नवनाथ भंडारे, सुभाष घोडके, सुनंदा खराटे, रामभाऊ कोठावळे, दिगंबर लडके, माया लडके व संतोष लांडगे आदींच्या सह्या आहेत. जिल्ह्यात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
More Stories
कळंब शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव;तात्काळ उपाययोजना न झाल्यास मराठा सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा
कळंबमध्ये आनंद इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्साहात उद्घाटन; पर्यावरणपूरक वाहनांच्या नव्या युगाची सुरुवात
रमजान निमित्त ‘एहसास’ची माणुसकीची उब;१५० राशन किट,सहरी टिफिन व रमजान टाइमटेबल कार्डचे वाटप