March 6, 2026

महाराजस्व अभियानास ७ मार्चपासून प्रारंभ ;५७ मंडळ मुख्यालयांवर नागरिकांना थेट सेवा

  • धाराशिव (जिमाका) – ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ७ मार्चपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
    जिल्ह्यातील ५७ मंडळांच्या मुख्यालयांवर ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून ती दिनांक ७ मार्च,१४ मार्च तसेच एप्रिल महिन्यात १० व १७ एप्रिल रोजी पार पडणार आहेत.या शिबिरांमधून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
    या शिबिरामध्ये शेतकरी व नागरिकांसाठी हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे भूमि अभिलेख विभागाशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच ई-मोजणीच्या सर्व सेवा शिबिराच्या ठिकाणीच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
    याशिवाय शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सनदा,मिळकत पत्रिका व प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना शिबिरातच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच भूसंपादन आणि बिनशेती झालेल्या मिळकतींचे कमी-जास्त पत्र तयार करून सातबारा सुलभ करण्याचेही या विभागाचे धोरण आहे.
    नागरिकांनी या समाधान शिबिरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्प डेस्कवरील सेवा व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!