March 6, 2026

तीव्र उन्हामुळे ग्रामीण शाळा सकाळी भरवाव्यात – ओबीसी बहुजन शिक्षक संघाची मागणी

  • धाराशिव – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने शाळांच्या वेळेत बदल करून त्या सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाने केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांना निवेदन देण्यात आले.
    संघाच्या वतीने शाळा सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत भरविण्याची विनंती करण्यात आली आहे. मागील वर्षी ६ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा आदेश प्रशासनाने काढला होता,मात्र यावर्षी अद्याप असा आदेश निघालेला नसल्याने संघाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
    ग्रामीण भागातील अनेक शाळा टिनशेड (टिन पत्र्याच्या छताच्या) असल्याने वर्गखोल्यांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते.तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव भासतो.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो,असे संघाने निवेदनात नमूद केले आहे.
    राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तीव्र उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले असल्याचे संघाने सांगितले.त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासनाने त्वरित आदेश निर्गमित करावेत,अशी मागणी करण्यात आली.
    यावेळी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने,राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!