प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप;चौकशीची मागणी
कळंब – विविध शासकीय योजनांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असल्याचे सांगत काही ठिकाणी नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.कार्ड बनवून देण्यासाठी ठराविक शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारणे,पावती न देणे तसेच तातडीची सेवा म्हणून अतिरिक्त पैसे घेणे अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर कळंब बस स्थानकावर १९९ रुपयांची पावती तर नागरिकांकडून २२० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. अनेकांना ‘ऑनलाईन प्रक्रिया शुल्क’, ‘तत्काळ सेवा शुल्क’ किंवा ‘डेटा एंट्री फी’ अशा विविध कारणांनी पैसे मोजावे लागत आहेत.मात्र या शुल्काबाबत स्पष्ट शासन निर्णय किंवा अधिकृत फलक दिसत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे,ग्रामीण भागातील व अल्पशिक्षित नागरिकांना प्रक्रियेची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप होत आहे.काही ठिकाणी दलाल सक्रिय असून प्रशासनाच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचीही चर्चा आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की,जर शासनाने निश्चित शुल्क ठरवले असेल तर त्याची स्पष्ट माहिती कार्यालयाबाहेर फलकावर लावावी व पावती देणे बंधनकारक करावे.अन्यथा संबंधितांवर कारवाई व्हावी.या प्रकारामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने स्मार्ट सुविधा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली योजना जनतेसाठी आर्थिक ओझे ठरू नये,व जनतेसाठी स्मार्ट कार्ड हे मोफत द्यावी अशी नागरिकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
More Stories
जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सोपान पवार सन्मानित
दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रंगोत्सवाचा आनंद
संत मदर तेरेसा विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी;यश वाघमारे जिल्ह्यात दुसरा,तालुक्यात पहिला!