१० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज; गुणवत्तेनुसार निवड यादी ११ मार्चला जाहीर
धाराशिव (जिमाका) – इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) व विशेष मागास प्रवर्ग (SBC) या घटकांतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२६ अशी आहे. जिल्ह्यात मुला व मुलींसाठी एकूण १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध करून देणे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणात संधी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.तसेच विविध व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १२ वी नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जांची छाननी करून ११ मार्च २०२६ रोजी गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १२ मार्च ते २० मार्च २०२६ या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया शासकीय वसतिगृहाबरोबरच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गतही राबविण्यात येत आहे. या योजनांमुळे विद्यार्थ्यांना निवास, शैक्षणिक सहाय्य व आर्थिक आधार उपलब्ध होणार आहे. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर सादर करावेत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात आवाहन करताना इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय धाराशिव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथील सहाय्यक संचालक यांनी संबंधित प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून,जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून आपल्या शैक्षणिक भविष्यास बळ द्यावे,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान