- लहानग्यांची वैज्ञानिक झेप;तांदुळवाडीतील कॅनव्हास स्कूलमध्ये विज्ञानाचा उत्सव

- कळंब – दिनांक २८ फेब्रुवारी २०२६,शनिवार रोजी National Science Day चे औचित्य साधून कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले.भूमिपुत्र अध्यक्ष इंजि.रवी नरहिरे यांच्या दूरदृष्टीने, सचिव प्रणव नरहिरे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य पवनकुमार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य पवनकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते करून करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना रमण यांच्या संशोधनकार्याची माहिती देण्यात आली तसेच विज्ञानविषयक जिज्ञासा जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे,विज्ञानवादी संसाधने आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक आकर्षक प्रकल्प सादर केले.इयत्ता तिसरीतील संघर्ष घोडके याने वाऱ्यापासून पवनचक्कीच्या साहाय्याने औष्णिक ऊर्जा निर्माण करणारा अभिनव प्रकल्प सादर करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली.तसेच एटीएम मशीनचे मॉडेल,रॉकेटचे प्रात्यक्षिक,सौरऊर्जेवरील साधने,पर्यावरणपूरक संकल्पना आदी विषयांवरील प्रकल्पांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली.
“लहान विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता,कल्पकता आणि प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर तयार केलेल्या या प्रकल्पांमुळे विज्ञानाविषयीची आवड वृद्धिंगत होत असल्याचे दिसून आले.पालक व ग्रामस्थांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी प्रशासकीय व्यवस्थापक सूर्यकांत कदम,रविकांत शेळके, ऋषिकेश खापे सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे तांदुळवाडी परिसरात विज्ञानाची गोडी निर्माण झाली असून कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक क्षेत्रातील आपली वेगळी ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे.




More Stories
एनएमएमएस परीक्षेत विद्याभवन हायस्कूल कळंबचे ४४ विद्यार्थी उत्तीर्ण,८ जणांचे शतकी यश
कळंब नगर परिषदेच्या ७२ कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात विविध उपक्रमांची मेजवानी