February 26, 2026

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू:१० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या प्रवेशासाठी १७ फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal� या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
    पालकांनी केवळ एकच ऑनलाईन अर्ज भरावा.अर्ज भरताना शाळेपासून घरापर्यंतचे अंतर गुगल मॅपद्वारे अचूक नोंदवावे.निवासाचा पत्ता,जन्मदिनांक,जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,फोटो आयडी,दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी माहिती अचूक व खरी भरावी.चुकीची माहिती भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.तसेच प्रवेशासाठी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी.
    वंचित गटात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,वि.जा.(अ),भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड),इतर मागासवर्ग (OBC),विशेष मागास प्रवर्ग (SBC),दिव्यांग,अनाथ तसेच एच.आय.व्ही.बाधित/प्रभावित बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
    मागासवर्गीय बालकांसाठी वडील किंवा बालकाचा जातीचा दाखला तहसिलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांचा असावा. परराज्यातील जातीचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.दुर्बल गटामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा २०२४-२५ मधील वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेला तहसिलदाराचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे.पगारदार पालकांसाठी कंपनी किंवा मालकाचा पगाराचा दाखलाही ग्राह्य धरला जाईल.
    निवासी पुराव्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील स्वतःच्या मालकीच्या निवासाबाबत रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,बीएसएनएल टेलिफोन देयक,प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी,मतदान ओळखपत्र,पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.स्वतःचे घर नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वी किमान ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे.भाडेकरारातील पत्त्यावर वास्तव नसल्यास पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका/अंगणवाडी/बालवाडीचा दाखला तसेच पालकांचे स्वयंनिवेदन ग्राह्य धरले जाईल.
    दिव्यांग बालकांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे किमान ४० टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे.अनाथ बालकांसाठी बालसुधारगृहाची कागदपत्रे आवश्यक राहतील.घटस्फोटीत महिलांसाठी न्यायालयीन निर्णय किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणाचा पुरावा तसेच बालकांच्या आईचे संबंधित अभिलेख आवश्यक आहेत.विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.एकल पालक (सिंगल पॅरेंट) पर्याय निवडल्यास संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.
    आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.आई किंवा वडिलांचे आधारकार्ड (अनाथ बालकांच्या बाबतीत सांभाळ करणाऱ्या पालकांचे आधारकार्ड) बालकाचे जन्म प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा.भाडे तत्त्वावर राहणाऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत. सामाजिक वंचित घटकांसाठी जातीचा दाखला व अपंगत्व प्रमाणपत्र (परराज्यातील दाखले ग्राह्य नाहीत). आर्थिक दुर्बल गटासाठी २०२३-२४ किंवा २०२४-२५ मधील १ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला.पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर अलॉटमेंट लेटर स्वतःच्या लॉगिनवरून डाउनलोड करून गटशिक्षण कार्यालयाच्या पडताळणी समितीकडे अर्ज व कागदपत्रांसह सादर करावे.
    पात्र ठरल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा.पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे.अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी गटशिक्षण कार्यालय किंवा शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) रवींद्र खंदारे यांनी केले आहे.
error: Content is protected !!