कळंब– कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडलेल्या कथित मारहाणीच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.स्थानिक गायक ऋतिक मोहन पटेकर यांनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी परमेश्वर कदम यांनी कोणतेही ठोस कारण नसताना काठीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून,निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तक्रारदाराच्या निवेदनानुसार,दि. १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास चौक परिसरात ही घटना घडली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने काठीने मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला व डाव्या पायाला दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.घटनेशी संबंधित छायाचित्रे व वैद्यकीय अहवाल तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवून निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी,तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी,अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.तक्रारीची प्रत विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर तसेच पोलीस महासंचालक,मुंबई यांनाही पाठविण्यात आली आहे. घटनेतील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, चौकशी कितपत निष्पक्ष होते आणि कारवाई कितपत पारदर्शक राहते,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून,प्रशासनाच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
More Stories
लेखकाने स्वतःचे साहित्य जन्मभूमीत प्रकाशित करावे — ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे
महारक्तदान शिबिरात ३०० शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; चार रक्तपेढ्यांना रक्तसंकलन सुपूर्त
धाराशिव प्रेस क्लब शाखेच्या वतीने शिवजयंतीनिमित्ताने स्तुत्य उपक्रम