धाराशिव (जिमाका)– जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाल्या असून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.दिनांक १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान नळदुर्ग येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे छापील साहित्य आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने तात्काळ कारवाई केली.तसेच याच दिवशी जळकोट येथील इंदिरा काळे कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर दोन परीक्षकांच्या वर्गात विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी संबंधित दोन पर्यवेक्षकांविरुद्ध FIR नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर दोन्ही पर्यवेक्षकांविरुद्ध संस्थेला निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व बोर्डाच्या भरारी पथकांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणे नोंदविली.रविंद्र खंदारे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या भरारी पथकाने रसायनशास्त्राच्या दाखल पेपरदरम्यान आर.पी.कॉलेज,धाराशिव येथे दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली.त्याच दिवशी बोर्डाच्या पथकाने डीपीएम कॉलेज,कळंब येथे एका विद्यार्थ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या पथकाने सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद प्रशाला परीक्षा केंद्राला भेट देऊन नऊ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणे दाखल केली.तसेच पर्यवेक्षणात दुर्लक्ष,कसूर व हयगय केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून तीन खाजगी संस्थांच्या शिक्षकांवर संस्थेमार्फत तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यास कळविण्यात आले आहे. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असून गैरप्रकारास मदत करणाऱ्या किंवा प्रतिबंध न करणाऱ्या पर्यवेक्षक व केंद्र संचालकांवर कडक दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. त्यामुळे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान,दिनांक २० फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ८९ केंद्रांवर व एका उपकेंद्रासह एकूण ९० परीक्षा केंद्रांवर सुरू होत आहेत.या परीक्षेसाठी एकूण २१ हजार ७०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.यासाठी डायट प्राचार्य,शिक्षणाधिकारी (प्राथमिक),शिक्षणाधिकारी (माध्यमिक), योजना विभाग तसेच उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक),पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाच्या पेपरदरम्यान वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकूण ९० बैठे पथके कार्यरत राहणार आहेत.तसेच संपूर्ण पेपरदरम्यान रनर तथा सहायक परिरक्षक यांच्या माध्यमातून ९० परीक्षा केंद्रांवर झूम मीटिंगद्वारे थेट (Live) नजर ठेवली जाणार आहे. दहावीच्या ७० परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून उर्वरित २० केंद्रांवर पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलून इतर केंद्रांतील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षेची पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
More Stories
ॲड.गुंड,काळे,घोलप,पवार, सुर्यवंशी,सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित
‘माय भारत (मेरा युवा भारत)’ मेगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ.रवींद्र खंदारे यांचे स्वागत; राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाकडून दिनदर्शिका भेट