कळंब – कळंब नगर परिषदची नूतन पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी उत्साहात पार पडली.विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करत शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.विशेषतः कळंब शहर डीजेमुक्त करण्याचा ठाम निर्णय आणि प्रभाग क्र. ६ मध्ये ‘नमो उद्यान’ उभारणीस मंजुरी या निर्णयांनी सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपनगराध्यक्ष लखन गायकवाड,मुख्याधिकारी मंजुषा गुरमे,शिवसेना नेते अतुल कवडे,विरोधी पक्षनेते संजय मुंदडा यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, विभागप्रमुख व सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान नगराध्यक्षा कापसे यांनी प्रशासन अधिक गतिमान करून नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल,असे स्पष्ट केले.शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा,रस्ते दुरुस्ती आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर प्राधान्याने कार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘स्वच्छ कळंब,सुंदर कळंब’ या संकल्पनेनुसार स्वच्छतेबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल,असेही त्यांनी ठामपणे सांगितले.शहर डीजेमुक्त करण्यामागे ध्वनीप्रदूषण रोखणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण सुरक्षित ठेवणे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी विविध कायदेशीर बाबींची माहिती देत मंजूर ठरावांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल,असे सांगितले.तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभाग क्र. ६ मध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’ प्रकल्पामुळे नागरिकांना सकस व हिरवाईने नटलेली विश्रांतीची जागा उपलब्ध होणार असून,मुलांसाठी खेळण्याची साधने,ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था आणि व्यायामासाठी खुली साधने उभारण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. कळंब नगर परिषदेची ही पहिली सर्वसाधारण सभा विकासाभिमुख निर्णयांमुळे चांगलीच गाजली असून,आगामी काळात शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
More Stories
शिवसेवा तालीम संघावर ‘शिवभूषण’चा मानाचा मुकुट
‘गरजा जय जय महाराष्ट्र माझा’च्या नादात कळंब रंगला; शिवजयंतीला ऐतिहासिक सुरुवात
श्वासाइतकेच ध्येयाला महत्त्व द्या – परमेश्वर पालकर