कळंब – कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चोऱ्या व अतिक्रमणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून व्यापाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.काही समाजकंटकांकडून बाजार समिती परिसरात सर्रास अतिक्रमण करण्यात येत असून व्यापाऱ्यांना धमकावून चोरीच्या घटनांना ऊत आला आहे.त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी दुकाने फोडून लूटमार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.बाजार समितीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने चोरीचे प्रमाण अधिक वाढल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.तात्काळ बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी मोंढा बंद ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले. बाजार समिती परिसरातील अतिक्रमणामुळे बाजाराची शिस्त पूर्णतः ढासळली असून नियमित व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अतिक्रमण करणाऱ्यांना अडथळा आणल्यास तुझे दुकान संध्याकाळी लुटलेच म्हणून समज अशा धमक्या दिल्या जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अनेक व्यापारी रात्री बाजार आवारात थांबणे टाळत असून काही व्यापारी बाहेर व्यवसाय करण्यास मजबूर झाले आहेत. या प्रकरणी बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून अतिक्रमण व चोरी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. योग्य ती कार्यवाही न झाल्यास बाजार समितीतील सर्व व्यापारी पोलीस स्टेशनसमोर उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर संचालक लक्ष्मण कोल्हे,रमेश अण्णा शेळके,लांडगे, राम शिंदे,विजय गुंजाळ,हनुमंत राखुंडे,दर्शन बलदोटा आदी व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. तसेच संबंधित व्यापाऱ्यांनी सन २०२६-२७ चे परवाने नुतनीकरण करणार नाहीत,अशी स्पष्ट भूमिकाही मांडली आहे. दरम्यान,या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन कळंब यांना देण्यात आली असून समाजविघातक कारवाया करणाऱ्या व चोरी करणाऱ्या आरोपींचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.बाजार आवारातील वाढते अतिक्रमण,चोरी व धमकावण्याच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार