जालना शहरातील कवितेच्या व गजलांच्या मैफिलीत रमणारं नाव म्हणजे गणेश खरात सर होय. त्यांची कविता माणसांच्या जगण्याशी निगडित नाते सांगणारी अशी आहे. भावूकता,व्याकुळता,प्रेम,शेती, माती,जिव्हाळा,वेदना,माणुसकी, जगण्याची उठाठेव,आबाळ या घटना पहात मोठी होत जाणारी आहे. त्यांच्या कवितेत कुठेही अक्रस्ताळेपणा नाही.कोणाविषयी चीड,तक्रार नाही.माणसाच्या भावबंधावर जगण्याचा अंकुश ठेवणारी आहे.जगण्याचा श्वास, जगण्याची आस म्हणजे गणेश खरात सरांची कविता होय. माणसानं माणसाशी माणसासारखं वागाव या तत्वाला कवेत घेणारी आहे.जिंदगानीची होरपळ,अनुभव,दुःख,सुखाची परवड,कोरड्या जगण्याचा पिळलेला श्वास म्हणजे खरात सरांची कविता होय. मनाच्या हिरवळीला बोचणारे दंश लेखणीच्या साह्याने गाडून जगण्याची कला ते शोधत राहतात. अवगत असणारं कौशल्य गरिबीच्या चटक्याने कसं होरपळतं,भुकेची वेदना,भुकेचा दाह जगण्याचं बळ हे नसणं अन असणं दोन्ही करुण डोळ्यांनी अनुभवनं हे सगळं काळजाला हात घालतं. काळजाच्या खपल्या पाडणारं लेखन शैलीला उजागर करतं. जगण्याचा संगर आणि संघर्ष, ओठातला शब्द,मनातली तडप, पायातले लुळेपण,पोटाची खळगी, हातातली चणचण,डोक्यातला विचार म्हणजे सरांची कविता होय. ते आपल्या गजलेत लिहितात – “निष्ठुर पावसाला नाही कदर कुणाची ! रानात पीक तान्हे करपून जात आहे !! किंवा पैशा पुढे गुणांना दावू नका तराजू ! मातीत स्वप्न अमुचे मिसळून जात आहे !! तरुणांचे सर्व स्वप्न या मातीत राजकारण्यांमुळे कसे चिरडून जात आहेत. त्याची ही वेदना आहे. प्रत्येकाला संपत्ती अमाप झाल्यामुळे घराला घरपण व माणुसकी राहिलेली नाही. याची खंत कवीला आहे. पुढे कवी असे लिहितात- “जखमेवरील खपली दावू तरी कुणाला ? दिलदार मित्र सुद्धा मिळणे कठीण झाले !! पूर्वी माणूस माणसाला,मैत्रीण मैत्रिणीला,मित्र मित्राला सावरायचा.काळजाच्या जखमा दाखवायचा.पण आज हसू अन आसू असणाऱ्या या नौटंकी दुनियेत खरा मित्र भेटणे दुर्मिळ आहे. ते स्वतः कुणाचाही द्वेष करत नाहीत. ते आपल्या कर्मासोबत लढतात. ते कधी दुःख कुरवाळत नाहीत, कुणाच्या यशावर टीका करत नाही, चालणे हा त्यांचा धर्म आहे. कर्माचे दान ते स्वीकारतात. बुद्धांच्या तत्त्वांचा अंगीकार करतात.आपल्या कुटुंबाला घराला माणसांना समाजाला आदरयुक्त सामोरे जातात.समाजातील लेकीबाळींना आणि आपल्या लेकीला ते संस्काराच्या उच्च आसनावर बसवतात.म्हणून त्यांची कविता म्हणते – “संस्कार मोतीयाचा गुणवान लेक माझी ! वाटे मला घराचा अभिमान लेक माझी !! संसार सांगतो हो हुंड्यात प्रेम नसते ! नात्यास जोडणारी धनवान लेक माझी !! आपल्या पै-पै कमाईचा त्यांना अभिमान तर आहे पण गर्वही आहे. ही कमाई कष्टाची आहे. विश्वासाची हेळसांड होणाऱ्या या जगात ते लिहीतात – “काचेसमान तुटतो विश्वास माणसांचा ! उपयोग होत नाही भौतिक साधनांचा !! कवीला सर्व कामे सोज्वळ वाटतात.प्रत्येक कामात ते आपल्या भाव शोधतात.जीवनात उच्च-नीच डावे-उजवे,हलके -भारी इत्यादी गोष्टींना तिलांजली देतात. फक्त हातावर,हाताच्या कमाईवर ते विश्वास ठेवतात.प्रत्येक वाटेवर संघर्षाच्या पावलांचे ठसे त्यांच्या कवितेत ठायीठायी दिसतात. शिवारी माय काळी ती जगाला भाकरी देते ! जरासा पावसाळा तर जरा सोसू उन्हाळा रे !! जगूया माणसावाणी जपूया हा जिव्हाळा रे !! खरंच कवी गणेश खरात सरांचा पिंडच हाडामासाच्या माणुसकीने भरलेला दिसतो आहे.देव दगडाचा या कवितेत ते लिहितात- “किती मेल्या पिढ्या अमुच्या सुखाचा शोध घेताना तरीही बुद्ध शांतीचा तयांनी दावला नाही” भिमाचा जन्म झाल्यावर किती अंधार ओसरला असा हा दीप समतेचा कुणीही लावला नाही” अन्याय अत्याचाराने भेदभावाने, निरक्षरतेने,जातीभेदाने किती एक आमच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. आम्ही अंधारात चाचपडलो पडलो आहोत.वेदनेत पोळलो आहोत तरी कुणीही आम्हाला सुख दाखवले नाही. कलहाने जीवन ग्रासलेले असताना शांती कुणीही बहाल केली नाही. मायेचा हात कुणीही दिला नाही. उलट आमच्या परिस्थितीची चेष्टा या प्रस्थापितांनी केली आहे. एकच देव कवीला दिसतो तो म्हणजे महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर.त्यांनीच कवीच्या जीवनात व समाजाच्या जीवनात समतेचा दीप लावला आहे.भीमरायाच्या जन्मामुळे लाखो पिढ्या उजळल्या आहेत. त्यांच्या त्यागातच कवी आपले जीवन ऋणी ठेवणार आहे. “शाळा शिकला मोठा झाला याचे कारण ढोरावाणी राबत होते आई बाबा ! कुस तापली उन्हानं गेली सुकुनिया ओल माती म्हणे आभाळाला थोडं मनातलं बोल !! शेवटी कवी जगण्याचा आयाम बांधत असताना व्यक्त होतो- “पाश काळजाचे मैफिलीत पोरके अन् दिखाव्याची भूमिका वास्तवात धन्य झाली पैशावर भाळणारी इच्छा मान्य झाली नात्यात भावनेची किंमत शून्य झाली !!”
पुस्तक परीक्षण काव्यसंग्रह “माती म्हणे आभाळाला” प्रकाशन अनघा प्रकाशन ठाणे (पूर्व) कवी- गणेश खरात सर,जालना
लेखिका – सौ.अलका विजय टोणगे सहशिक्षिका, विद्याभवन हायस्कूल कळंब. जिल्हा धाराशिव M. No.9420770480.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार