धाराशिव – धाराशिव येथे दि. 18/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विष्णू ठोंबरे उपस्थित होते. तसेच अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध,शीख,पारसी व जैन समाजातील जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध समाजातील प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी,समस्या व सवलतींबाबत आपले विचार मांडले. या प्रसंगी बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन,धाराशिवच्या वतीने जिल्हा प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त कामगार नेते शंकर का.खुने,समाजभूषण ॲड. ज्योती बडेकर व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माळाळे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात बौद्ध अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी,बौद्ध समाजातील अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे,तसेच त्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी योग्य उपाययोजना व उपक्रम राबवावेत,अशी मागणी करण्यात आली. युवक व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योग व व्यवसाय सुरू करण्याकरिता या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात यावे,यासाठी विविध योजना तयार करून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा,अशीही मागणी करण्यात आली.बौद्ध समाजातील सांस्कृतिक,शैक्षणिक,धार्मिक, आर्थिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदानाची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच बौद्ध भिक्खूंना राज्यात रेल्वे व बस प्रवासासाठी मोफत प्रवास योजना राबविण्यात यावी.गंभीर आजारामुळे खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यास त्यावरील खर्चाची भरपाई करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी.बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांसाठी शासनाने स्वतंत्र योजना तयार करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. या सर्व मागण्या शासनाकडे शिफारस करून सादर करण्यात येतील,असे आश्वासन जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी दिले.अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी शंकर का. खुने यांनी दिली.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान