February 8, 2026

होळकर चौक–मोहा रस्त्याची दयनीय अवस्था;नागरिकांचा तहसीलदारांना जाब विचारणारे निवेदन

  • कळंब – कळंब शहरातील होळकर चौक ते मोहा या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांचे हाल होत असून हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रणव रवी नरहिरे यांनी दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदार, कळंब यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,सदर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे दररोज हजारो वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड व खडी विखुरलेली असून गेल्या सहा महिन्यांत अनेक वाहनांचे टायर कट होऊन बदलावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
    रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचे शॉक-अब्झॉर्बर वारंवार खराब होत असून व्हील अलाईनमेंट व पाट्या सतत दुरुस्त कराव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढला असून कार, ट्रक व बससारख्या वाहनांचा मेंटेनन्स खर्च किमान पाचपट वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    विशेषतःअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका,रुग्णालयीन सेवा तसेच व्यावसायिक प्रवासासाठी या मार्गावरून जाण्यास सामान्य वेळेपेक्षा दहा पट अधिक वेळ लागत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर व धोकादायक ठरत आहे.
    या सर्व बाबी लक्षात घेता,होळकर चौक ते मोहा हा मार्ग तात्काळ दुरुस्त करून अपूर्ण काम पूर्ण करावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना त्वरित कराव्यात,अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!