साधन व अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम
कळंब – साधन,नवी दिल्ली आणि अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील हसेगाव के.येथील पर्याय सामाजिक संस्था कॅम्पस मध्ये दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी महिला बचत गट सदस्य व फायनान्स कर्मचारी यांच्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस साधन संस्थेकडून मेहताब आलम यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक माननीय विश्वनाथ तोडकर,मुख्यालयाचे माननीय यशवंत आहेर, तेजश्रीताई तोडकर,अनिक धाराशिव जिल्हा ऑपरेशन हेड विलास गोडगे आणि संचालक ऋषिकेश तोडकर उपस्थित होते. या उपक्रमात महिला बचत गटांच्या गटप्रमुखांसह अनिक धाराशिव अंतर्गत सर्व शाखांतील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. कार्यशाळेत साधन संस्थेचे मेहताब आलम यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व विशद करत बँक खाते उघडण्याचे फायदे,नियमित बचत, आपत्कालीन परिस्थितीसाठी आर्थिक शिस्त यावर मार्गदर्शन केले.तसेच उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी बजेटिंग, गरजा व इच्छांमधील फरक ओळखणे आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी नियोजन करण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी डिजिटल बँकिंग संदर्भात UPI,ATM व मोबाईल बँकिंगचा सुरक्षित वापर, PIN व OTP गोपनीय ठेवणे तसेच सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच प्रधानमंत्री जन-धन योजना, विमा व पेन्शन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. कर्ज व्यवस्थापन विषयावर बोलताना गरजेपुरते व उत्पादक उद्देशासाठीच कर्ज घेणे, वेळेवर परतफेड करणे व चांगला क्रेडिट स्कोअर राखण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. ही कार्यशाळा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया सहभागी सदस्यांनी व्यक्त केली.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन