धाराशिव (जिमाका) – स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत दि. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या कालावधीत मतमोजणी परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १६३ लागू करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर, नळदुर्ग,उमरगा,मुरुम,कळंब,भूम व परंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. जिल्ह्यातील वरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,या दृष्टीकोनातून मतमोजणीच्या ठिकाणी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १६३ जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे कृत्य करण्यास मनाई केली आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालये,मंडप,सर्व दुकाने तसेच मोबाईल फोन,पेजर,वॉकी-टॉकी, ध्वनीक्षेपके,सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. निवडणूक मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त इतर खाजगी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळता पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. मतमोजणी परिसरात मतमोजणी कामकाजाव्यतिरिक्त ध्वनीक्षेपक वापरणे,वाद्य वाजविणे तसेच मिरवणुका काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.निवडणूक मतमोजणी कामासाठी नियुक्त असलेल्या अधिकारी कर्मचारी व्यतिरिक्त इतर व्यक्तींना वैध ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी लागू राहणार नाही.जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर,नळदुर्ग,उमरगा,मुरूम,कळंब, भूम व परांडा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीची कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ वाजतापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा आदेश अंमलात राहणार आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान