February 8, 2026

डॉ.बाबा आढाव व पनालाल सुराणा भाऊ यांच्या प्रेरणेतून समाजकार्याची वाटचाल – विश्वनाथ (अण्णा) तोडकर

  • कळंब – “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय,हक्क व माणुसकी पोहोचवण्याची शिकवण मला ज्येष्ठ समाजसुधारक डॉ.बाबा आढाव आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक पनालाल सुराणा भाऊ यांच्याकडून मिळाली.त्यांच्या विचारांमुळेच माझ्या जीवनाला दिशा मिळाली,”असे भावनिक उद्गार पर्याय सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा तथा लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी काढले.
    डॉ.बाबा आढाव यांच्या श्रद्धांजली सभेप्रसंगी ते बोलत होते.
    यावेळी सामाजिक,शैक्षणिक व कामगार क्षेत्रातील बप्पा शीलवंत,ह.भ.प महादेव महाराज आडसूळ,भास्कर सोनवणे,के.व्ही.सरवदे,रमेश बोर्डेकर,राजेंद्र बिक्कड,संतोष भोजने,सुभाष गायकवाड,सुरेन्द्र चिलवंत,यशवंत हौसलमल,अच्युत पौळ,मोराळे,सचिन क्षीरसागर,अविनाश घोडके आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
    तोडकर पुढे म्हणाले की,डॉ.बाबा आढाव यांनी आयुष्यभर श्रमिक, शेतकरी,कष्टकरी,वंचित घटकांसाठी संघर्ष केला.त्यांचा साधेपणा,निर्भीडपणा आणि अन्यायाविरोधातील लढा हा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.

  • पनालाल सुराणा भाऊ यांच्या सहवासातून सामाजिक कार्याला केवळ भावनिक नव्हे तर संघटित, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण स्वरूप कसे द्यावे,हे शिकायला मिळाले,असे सांगत तोडकर म्हणाले की,“संस्था म्हणजे केवळ नाव नसून ती समाजबदलाचे साधन असते,ही जाणीव मला त्यांच्या कार्यातून झाली.”
    पर्याय सामाजिक संस्था व लोकविकास मंचाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी प्रश्न, कामगार हक्क, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्यात येत आहे.

  • या सर्व कार्यामागे डॉ.बाबा आढाव यांच्या विचारांची आणि सुराणा भाऊ यांच्या मार्गदर्शनाची प्रेरणा असल्याचे तोडकर यांनी स्पष्ट केले.
    स्वराज इंडिया,स्वराज अभियान व भारत जोड अभियानच्या वतीने डॉ.बाबा आढाव यांची शोकसभा दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील विरंगुळा केंद्रात संपन्न झाली.
    या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती,कळंब तालुका अध्यक्ष सी. आर.घाडगे होते.यावेळी पन्नालाल भाऊ सुराणा व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (चाकूरकर) यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    यावेळी बोलताना अध्यक्ष सी.आर. घाडगे म्हणाले की,“डॉ.बाबा आढाव यांचे विचार केवळ स्मरणापुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”त्यांनी जन सुरक्षा विधेयकाबाबत जनजागृती व लोकशाही मार्गाने होणाऱ्या संघर्षाची भूमिकाही स्पष्ट केली. या शोक सभेचे सूत्रसंचालन स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी तर प्रस्तावना स्वराज इंडियाचे शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत यांनी केले.

  • दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    शोकसभेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शांत,शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!