May 10, 2026

डॉ.बाबा आढाव यांना धाराशिवमध्ये भावपूर्ण आदरांजली

  • असंघटित कामगारांचा बुलंद आवाज शांत झाला,पण विचार अमर राहिले
  • धाराशिव – महाराष्ट्रातील असंघटित कामगार चळवळीचे प्रणेते,हमाल पंचायतचे संस्थापक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील सक्रिय आंदोलनकर्ते डॉ.बाबा आढाव यांना धाराशिव येथील श्रीकृष्ण नागरी पतसंस्था येथे आयोजित कार्यक्रमात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
    डॉ.बाबा आढाव यांनी हमाल, माथाडी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला.कामगारांना न्याय, सन्मान व सुरक्षितता मिळावी यासाठी त्यांनी उभ्या आयुष्यात लढा दिला.सामाजिक न्याय, समता आणि संविधानातील मूल्ये त्यांनी केवळ मांडली नाहीत तर ती प्रत्यक्ष कृतीतून जगून दाखवली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
    या कार्यक्रमास कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे,संविधान संरक्षण समितीचे प्रा.डॉ.दिनकर झेंडे, प्रदीप शिंदे,बाळासाहेब माने, प्रभाकर बनसोडे,अ‍ॅड.अजित कांबळे तसेच रि.पा.इं. (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राउत यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमात विजय गायकवाड यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या काळात ठाणे सेंट्रल कारागृहात डॉ.बाबा आढाव यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.तसेच हरिभाऊ बनसोडे आणि प्रा.डॉ. दिनकर झेंडे यांनी आपल्या भाषणातून डॉ.बाबा आढाव यांच्या विचारधारेचे व कार्याचे महत्त्व विशद केले.
    कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाकर बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
error: Content is protected !!