कळंब – प्रलंबित विकास कामांना गती देऊन कळंब शहराचा चेहरा मोहरा बदलणे हे महायुतीचे ध्येय असून,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राणी उर्फ सुनंदा कापसे यांना विजयी करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही,असे आश्वस्त करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी सावरकर पुतळा,मेन रोड येथे आयोजित शिवसेना–भाजपा–रिपब्लिकन महायुतीच्या प्रचार सभेत जोरदार भाषण केले.
सरनाईक म्हणाले की,“माझ्या लाडक्या बहिणींनी मला विधानसभेत निवडून दिले,आता कळंबच्या विकासासाठी नगराध्यक्षपदी राणी उर्फ सुनंदा कापसे यांना विजयी करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.”
*ट्रिपल इंजिन सरकारची गरज – आमदार राणा जगजीतसिंह पाटील*
या सभेत तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी भाषण करताना सांगितले की, कळंबच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रिपल इंजिन सरकार हा उत्तम पर्याय असून,शहरातील प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रखडलेल्या अनेक विकास योजनांना भाजप–शिवसेना सरकार आल्यानंतर गती मिळाली.”
शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी शहरातील विविध मंदिर विकास, बालोद्यान उभारणी,तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण यासाठी भरीव निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. “ही कामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होतील,” असे ते म्हणाले.
*जागा वाटपावरून तणाव – परंतु पक्षाची भूमिका स्पष्ट*
नगराध्यक्षपदाच्या जागावाटपावरून शिंदे गटाने व्यक्त केलेल्या नाराजीचा उल्लेख सभेत झाला. “भाजपने पाठीत खंजीर खुपसला” अशा टीकाही करण्यात आल्या होत्या. मात्र, पालकमंत्री सरनाईक यांनी या सभेत महायुती एकजूट आहे आणि पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत तणाव निवाळला.
“ *विकासकामांची हीच परंपरा पुढे नेणार” – शिवाजी (आप्पा) कापसे* पूर्वी नगराध्यक्ष राहिलेले शिवाजी (आप्पा) कापसे यांनी शहरातील सिमेंट रस्ते,मार्केट यार्डातील सुविधा, व इतर महत्वाच्या विकासकामांची माहिती देत पुढेही नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले.
*महिलांसाठी सबलीकरण, रोजगाराला प्राधान्य – राणी उर्फ सुनंदा कापसे* महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राणी उर्फ सुनंदा कापसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,शहराचा सर्वांगीण विकास,महिलांचे सबलीकरण,सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी यावर विशेष भर देणार आहेत. त्यांनी सांगितले की,“आप्पांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात लावलेले सीसीटीव्ही कुठे गायब झाले? दुष्काळी परिस्थितीत त्यांनी नागरिकांना पाण्याची टंचाई भासू दिली नाही.ही सेवा अखंड सुरू ठेवू.” या सभेला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण चौधरी,दत्ता साळुंखे, शहराध्यक्ष मकरंद पाटील,भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी गिड्डे, शिवसेना तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते,रिपाई आठवले गटाचे बंडू (भाऊ) बनसोडे,शिवाजी शिरसाट,अनिल हजारे यांसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार