February 8, 2026

शेतपिक नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी अनिवार्य

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या संदर्भातील विविध शासन निर्णयांद्वारे १२ लक्ष ५१ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना एकूण ११५४.८० कोटी रुपये (अक्षरी रुपये आकराशे चोपन्न कोटी ऐंशी लक्ष रुपये) इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
    अखेर ८ लक्ष ९७ हजार ६७४ शेतकऱ्यांसाठी ७९६.२१ कोटी रुपये (अक्षरी रुपये सातशे एकोणसत्तर कोटी एकवीस लक्ष रुपये) इतका निधी पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.त्यापैकी ७ लक्ष ९० हजार ६०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष ६८७.११ कोटी रुपये (अक्षरी रुपये सहाशे सत्त्याऐंशी कोटी अकरा लक्ष रुपये ) जमा झाले आहेत.
    महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना—शेतपिक नुकसान भरपाई,कृषी विभागाच्या योजना—यासाठी ‘अँग्री स्टॅक’ (Farmer ID) नोंदणी अनिवार्य केली आहे.
  • जिल्ह्यात एकूण खातेदार संख्या ४ लक्ष ७७ हजार ४४ इतकी असून त्यापैकी ३ लक्ष ७९ हजार ६८३ शेतकऱ्यांची ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी पूर्ण झाली आहे.तरीही ९७ हजार ३६१ शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे,तर १४ हजार ५४७ नोंदण्यात तफावत आढळली आहे.
    ज्या शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी केली नाही,त्यांना खालील महत्वाच्या योजनांपासून वंचित राहावे लागू शकते.पीएम किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN),पीक विमा योजना (Crop Insurance), नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, कृषी कर्ज प्रक्रिया व बँक कर्ज, महाडीबीटी (MahaDBT) योजनांचा लाभ,किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी
  • ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणीमुळे शेतकऱ्यांचा सर्व डेटा एका पोर्टलवर सुरक्षित राहतो तसेच शासकीय योजनांचा थेट लाभ बँक खात्यात जमा होण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान बनते.या नोंदणीमुळे भविष्यात कागदपत्रे वारंवार देण्याची आवश्यकता राहणार नाही.
    नोंदणी कशी करावी.शेतकरी स्वतः https://mhfr.agristack.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात.ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही त्यांनी कृषी सहाय्यक,तलाठी, ग्रामसेवक किंवा जवळच्या CSC / महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड,सातबारा उतारा,बँक पासबुक व मोबाईल क्रमांक .
    ई-केवायसीची तातडीची आवश्यकता
    ज्या शेतकऱ्यांनी शेती पिक नुकसानासाठी Farmer ID नोंदणी केली असली,तरी त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नसल्यास किंवा ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी अद्याप पूर्ण नसेल,त्यांना अनुदान मिळण्यासाठी eKYC प्रक्रीया सुरु केली आहे.अशा शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा CSC केंद्रात जाऊन तातडीने eKYC करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
error: Content is protected !!