कळंब (महेश फाटक) –
कळंब नगरपरिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू होत असताना स्थानिक राजकारणात चुरस वाढू लागली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण पुरुष गटात शितल रामचंद्र चोंदे यांनी आज अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आपल्या कार्यकर्ते व समर्थकांसह तहसील कार्यालयात पोहोचताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने अर्ज दाखल प्रक्रिया दिमाखात पार पडली.
अर्ज दाखल करताना चोंदे म्हणाले की, नगर परिषदेतील विकासकामांना गती देणे, स्वच्छता अभियान अधिक मजबूत करणे आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करणे,ही त्यांची प्राथमिक उद्दिष्टे असतील. तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर ते विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक उपक्रमांतून सातत्याने कार्यरत असल्याने चोंदे यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 1 मधील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळत असल्याची चर्चा आहे.
यंदा या प्रभागात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, चोंदे यांच्या आगमनामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अर्ज छाननीनंतर अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यानंतर प्रचाराची गती अधिक वाढणार आहे.
दरम्यान इतर उमेदवारही अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याने प्रभाग 1 हा सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. चोंदे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून प्रभागात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
नगरपरिषद निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राजकीय वातावरण अधिक तापत असून, प्रभाग क्रमांक 1 मधील ही लढत कळंब शहराचे लक्ष वेधणारी ठरणार आहे.
More Stories
माजी प्राचार्य संजय भोसले यांना ‘संस्थामाता सुमनताई मोहेकर’विशेषांक सप्रेम भेट
हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस उत्साहात
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना कृतज्ञ अभिवादन